Diwali Festival 2020 : पाच शतकांचा साक्षी असलेल्या कोटाच्या पायऱ्यांवर दीपोत्सव; 'पांढरीच्या कोटा'चा इतिहास पुन्हा उजाळला

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 14 November 2020

पाच शतकांतील इतिहासाची साक्ष असलेल्या कसबा पेठेतील कोटाच्या कोकण दरवाजाच्या पायऱ्यांवर दीपोत्सव साजरा करण्यात आला आहे.

पुणे : शहराच्या पाच शतकांतील इतिहासाची साक्ष असलेल्या कसबा पेठेतील कोटाच्या कोकण दरवाजाच्या पायऱ्यांवर दीपोत्सव साजरा करण्यात आला आहे. वारसा प्रसारक मंडळी कडून या पांढरीच्या कोटाची सुरवातीला साफसफाई करण्यात आली, त्यानंतर कोटाच्या सौंदर्याला बाधा आणणारी झाडं-झुडपं हटवण्यात आल्याचे अध्यक्ष साकेत देव यांनी सांगितले. 

हे ही वाचा : बावीस वर्षांपासून राजगडावर वसुबारस साजरा करणारे केशव आरगडे

दिवाळीनिमित्त सुमारे 500 दिवे लावून 500 वर्ष जुन्या ठिकाणी दीपोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी इथल्या रहिवाशांना, पर्यटकांना या स्थळाची माहिती व्हावी म्हणून एक माहिती फलक लावण्यात आला आहे. नगरसेवक योगेश समेळ यांच्या सहकार्याने हा दीपोत्सव साजरा करण्यात आल्याचे देव यांनी सांगितले. 

हे ही वाचा : यावर्षी दिव्यांगाची दिवाळी अंधारातच
 

पायऱ्यांचा इतिहास

बहामनी सरदार 'बर्या अरब'ने पुण्यात 1470 च्या आसपास 'किल्ले हिस्सार' किंवा पांढरीचा कोट नावाचा एक कोट बांधला होता. हा कोट आजच्या कसबा पेठे भोवती होता. या कोटाचे मोजमाप करायचे म्हटले तर काकासाहेब गाडगीळ पुतळा ते कुंभारवाडा चौक आणि मोटे मंगल कार्यालय ते मोती चौक एवढ्या परिसरात हा कोट होता. किल्ल्याचे मुख्य दरवाजा आजच्या 'पवळे चौकात' होते ते दुसरा 'कोकण दरवाजा' हा हाउस ऑफ फॉर्म (कसबा पेठ) जवळ होता. कालांतराने या कोटाच्या तटबंदी आणि दरवाजे नामशेष झाले, मात्र कोकण दरवाजातून नदीत उतरणाऱ्या पायऱ्या गेली 500 वर्ष टिकून आहेत. 

संपादन - सुस्मिता वडतिले 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Diwali Festival 2020 The fort at Pandhari has been cleaned by Vars Prasarak