मंगलमय वातावरणात विधिवत लक्ष्मीपूजन 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 28 ऑक्टोबर 2019

शहरात मंगलमय आणि प्रसन्न वातावरणात लक्ष्मीपूजन करण्यात आले. यंदाचा लक्ष्मीपूजेचा मुहूर्त साडेसात ते नऊपर्यंतचा होता. पणत्यांची आरास केलेल्या घरांमध्ये आणि आकाशकंदील लावलेल्या दुकानांमध्येही विधिवत लक्ष्मीपूजन करण्यात आले.

पुणे - शहरात मंगलमय आणि प्रसन्न वातावरणात लक्ष्मीपूजन करण्यात आले. यंदाचा लक्ष्मीपूजेचा मुहूर्त साडेसात ते नऊपर्यंतचा होता. पणत्यांची आरास केलेल्या घरांमध्ये आणि आकाशकंदील लावलेल्या दुकानांमध्येही विधिवत लक्ष्मीपूजन करण्यात आले. धन-धान्य, लक्ष्मीच्या पूजेबरोबरच नागरिकांनी वाहनांचे, दुकानांचे आणि साहित्याचे पूजन केले. 

मागील वर्षापेक्षा यंदा फटाक्‍यांचा आवाज घटला होता. मात्र, परंपरा म्हणून लक्ष्मीपूजनानंतर फटाक्‍यांची आतषबाजी करण्यात आली. सकाळी दिवाळीच्या अभ्यंगस्नानाने शुचिर्भूत होऊन ग्रामदैवतांचे दर्शन घेतले. यंदा नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन एकाच दिवशी आले होते. 

लक्ष्मीपूजनानिमित्त शहरातील विविध देवतांना आणि मंदिरांना विशेष आरास करण्यात आली होती. सारसबागेतील श्री महालक्ष्मीला सोन्याची साडी परिधान करण्यात आली होती. तसेच, विविध मंदिरांमध्ये देवीची आरास करून विधिवत पूजा करण्यात आली. मागील काही दिवसांपासून बरसणाऱ्या वरुणराजाने रविवारी (ता. 27) विश्रांती घेतल्यामुळे नागरिकांना दिवाळसणाची आवश्‍यक कामे करता आली. दिवसभर लक्ष्मीपूजनासाठी आवश्‍यक पूजासाहित्याची आणि त्याचबरोबर पाडव्याच्या पूजेसाठी व्यापारीवर्ग खतावणी, नवीन वह्यांची खरेदी करताना दिसत होते. मागील दोन दिवस शहरातून गावाकडे परतणाऱ्या चाकरमान्यांमुळे वाहतूक कोंडी झाली होती. आज त्यातून सुटका मिळाल्याने आवश्‍यक खरेदीसाठी पुणेकर बाहेर पडताना दिसले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Diwali laximipujan

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: