आरोग्यदायी जीवनासाठी 'दिवाळी पहाट रन' | Diwali Festival 2019

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 27 ऑक्टोबर 2019

Diwali Festival 2019 :  शनिवारवाड्यापासून शनिवारी सकाळी सहा वाजता दिवाळी पहाट रनला सुरवात झाली. साडी, पैठणी, कुर्ता, पुणेरी पगडी, धोतर अशा पारंपरिक वेशभूषेत यात नागरिक सहभागी झाले होते. पोटसुळ्या मारुती, दगडूशेठ गणपती, गुंडाचा गणपती, प्रेमळ विठ्ठल, कसबा गणपती अशा विविध धार्मिक स्थळांचे नागरिकांनी दर्शन घेतले.

Diwali Festival 2019 : पुणे : पारंपरिक पोशाखात नटलेले पुणेकर शनिवारवाड्यासमोर गर्दी करत होते. ही गर्दी कोणत्याही 'दिवाळी पहाट'च्या सुरेल शास्त्रीय मैफलीसाठी नव्हती, तर चक्क धावण्यासाठी जमा झाली होती. निमित्त होते डिसेंबर महिन्यात होणाऱ्या बजाज आलियांज, एपीजी रनिंग आणि 'सकाळ माध्यम समूहा'च्या पुणे अर्धमॅरेथॉनची पूर्वतयारी म्हणून 'दिवाळी पहाट रन'चे. 

शनिवारवाड्यापासून शनिवारी सकाळी सहा वाजता दिवाळी पहाट रनला सुरवात झाली. साडी, पैठणी, कुर्ता, पुणेरी पगडी, धोतर अशा पारंपरिक वेशभूषेत यात नागरिक सहभागी झाले होते. पोटसुळ्या मारुती, दगडूशेठ गणपती, गुंडाचा गणपती, प्रेमळ विठ्ठल, कसबा गणपती अशा विविध धार्मिक स्थळांचे नागरिकांनी दर्शन घेतले. धायरीतील धावपटू प्रीती झुंझुरके म्हणाल्या, ""पारंपरिकतेला जोपासून दिवाळी पहाट रनमध्ये सहभागी होता आले. आरोग्यदायी राहण्यासाठी धावणे आवश्‍यक आहे.'' 

या वेळी अभिनेता निखिल वैरागर, मॉडेल अनुजा शिंदे, अभिनेत्री झोया खान व झेबा शेख हे सेलिब्रिटीही उपस्थित होते. झेबा म्हणाली, ""आरोग्यदायी जीवनासाठी धावणे हा उत्तम व्यायाम आहे. हाच संदेश देण्यासाठी दिवाळीनिमित्त ही पहाट रन पार पडली. यामध्ये सहभागी झाल्यामुळे अधिकच प्रसन्न वाटत असून, डिसेंबरमध्ये होणाऱ्या बजाज आलियांज पुणे अर्धमॅरेथॉनमध्ये मी सहभागी होणार आहे.'' दरम्यान, आयोजकांतर्फे स्पर्धकांच्या तयारीसाठी शहरात 12 ठिकाणी प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. गुरुवार (ता. 31) पासून पुढील आठ आठवडे हे प्रशिक्षण पार पडणार आहे. 

22 डिसेंबरला पुणे हाफ मॅरेथॉन 
बजाज आलियांज पुणे हाफ मॅरेथॉनचे 22 डिसेंबर रोजी आयोजन केले आहे. स्पर्धेचे हे दुसरे वर्ष आहे. पहिल्या वर्षी 15 हजारांहून अधिक स्पर्धकांनी यात सहभाग घेतला होता. ही स्पर्धा बालेवाडी स्टेडिअममध्ये होणार आहे. हाफ मॅरेथॉनबरोबरच दहा, पाच आणि तीन किलोमीटरची कौटुंबिक धावण्याची स्पर्धाही होणार आहे. स्पर्धेतील विजेत्यांना 21 लाख 36 हजार रुपयांची विविध 162 बक्षिसे मिळणार आहेत. सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी www.baphm.com या संकेतस्थळावर नोंदणी करावी. 

दिवाळीनिमित्त फिट राहण्याचा संदेश "दिवाळी पहाट रन'च्या माध्यमातून देण्यात आला आहे. पारंपरिक पोशाखात धावताना एक प्रसन्न अनुभूती मिळाली. 
- अनुजा शिंदे, मॉडेल 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Diwali Morning Run for Healthy Living in Pune Half Marathon