वैद्य खडीवाले, गावडे, अभ्यंकर यांना डी.लिट्‌.

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 जानेवारी 2017

टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचा पदवीप्रदान समारंभ; 110 विद्यार्थ्यांना पीएच.डी.
पुणे - टिळक महाराष्ट्र विद्यापीठाने आयुर्वेद उपचारपद्धती क्षेत्रातील योगदानाबद्दल परशुराम यशवंत वैद्य खडीवाले, शिक्षण क्षेत्रातील योगदानाबद्दल शिक्षणतज्ज्ञ डॉ. प्र. ल. गावडे आणि ज्ञानप्रबोधिनीचे माजी प्राचार्य वा. ना. अभ्यंकर यांना मानद डी.लिट्‌. प्रदान केली.

विद्यापीठाच्या 28 व्या पदवी प्रदान समारंभाच्या निमित्ताने कुलपती विश्‍वनाथ पळशीकर आणि कुलगुरू डॉ. दीपक टिळक यांच्या हस्ते मानद पदवी प्रदान करण्यात आली. या समारंभात 5 हजार 422 विद्यार्थ्यांना पदवी, तर 110 विद्यार्थ्यांना विद्यावाचस्पती (पीएच.डी.) पदवी देण्यात आली. प्रभारी कुलसचिव डॉ. अभिजित जोशी, अधिष्ठाता डॉ. गीताली टिळक, डॉ. प्रणिती टिळक आदी उपस्थित होते.

डॉ. टिळक म्हणाले, 'विद्यापीठाला दोन वर्षांपूर्वी न्यायालयीन लढा आणि पाठोपाठ नॅक कमिटीच्या मानांकनाच्या प्रश्‍नाला सामोरे जावे लागले. या काळात अडचणी आल्या होत्या; परंतु विद्यार्थी आणि पालकांनी आमच्यावर प्रचंड विश्वास दाखवला. आता नऊ अधिष्ठाता, चार विभागांचे एकवीस विभाग, तीन हजार विद्यार्थ्यांवरून 16 हजार विद्यार्थ्यांचा टप्पा पार केला आहे. खारघर, नवी मुंबई येथे नवीन अभ्यासक्रमांची सुरवात करणार आहोत. तसेच, गुणवत्ता हा एकच निकष डोळ्यांसमोर ठेवून सीबीएसई बोर्डाची इंग्रजी माध्यम शाळा सुरू केली जाणार आहे.''

डॉ. गावडे म्हणाले, 'लोकमान्य टिळकांनी म्हटले होते, की भारतातील शिक्षण हे मातृभाषेतून असावे. त्यातील विषय येथील संस्कृतीला पोषक असावेत आणि शिक्षक ध्येयवादाने प्रेरित असावेत. टिळक विद्यापीठ याच त्रिसूत्रीच्या आधारे सुरू आहे.''

संस्कृतच्या शाळा सुरू करा
अभ्यंकर म्हणाले, 'टिळकांनी इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू करणे हे कालसुसंगत आहे; परंतु त्यांनी संस्कृत माध्यमाच्या शाळादेखील सुरू कराव्यात. मॅडम, सर असे अनेक शब्द मराठीत रुढ झाले आहेत, त्यांना पर्यायी शब्द घडविता येतील. शिक्षणाचा उद्देश हा उत्तम माणूस घडविण्याचा असला पाहिजे, तेच राष्ट्रीय शिक्षण आहे.''

Web Title: d.lit post distribution