'डीएमयू'ची वेळ सोयीस्कर हवी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 26 मार्च 2017

दैनंदिन प्रवाशांची मागणी - दौंडहून सकाळी, तर पुण्याहून सायंकाळी दोन गाड्या आवश्‍यक

दैनंदिन प्रवाशांची मागणी - दौंडहून सकाळी, तर पुण्याहून सायंकाळी दोन गाड्या आवश्‍यक
पुणे - बहुप्रतीक्षेत असलेली पुणे-दौंड-पुणे ही डिझेल मल्टिपल युनिट (डीएमयू) उपनगरीय रेल्वे अखेर शनिवारपासून सुरू झाली. ही गाडी दौंडवरून पहाटे 5 आणि सकाळी 8 वाजता, तर पुण्यातून सायंकाळी 6 आणि रात्री 9 वाजता सुरू करावी, अशी आग्रही मागणी पुण्यात नोकरी, शिक्षण व व्यवसायासाठी येणाऱ्या प्रवाशांनी "सकाळ'शी संवाद साधताना केली.

गेली 20 वर्षे दौंडवरून रेल्वेने पुण्यात येणाऱ्या उषा बनसोड म्हणाल्या, 'दौंडसाठी "डीएमयू' सुरू झाली, याचा आनंद आहे; परंतु ही गाडी पहाटे 5 वाजता आणि सकाळी 8 वाजता दौंडवरून सुटल्यास नोकरी, व्यवसायासाठी पुण्यात येणाऱ्या नागरिकांसाठी अंत्यत सोयीची ठरेल. तसेच पुण्याहून दौंडसाठी सायंकाळी 6 आणि रात्री 9 वाजता ही गाडी सुरू केल्यास हजारो लोकांचा वेळ, पैसा वाचेल.''

केडगावचे रहिवासी हुसेन अब्दुल शेख म्हणाले, 'मी गेल्या 15 वर्षांपासून रेल्वेने पुण्यात नोकरीसाठी येतोय. लांब पल्ल्याच्या एक्‍स्प्रेस गाड्यांशिवाय आम्हाला दुसरा पर्याय नव्हता. दौंडवरून पहाटे आणि सायंकाळी 6 ते 8 दरम्यान "डीएमयू' गाडी सुरू केल्यास आम्हा प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल.''

यवतचे रहिवासी बाबूराव चव्हाण म्हणाले, 'जिल्ह्यामध्ये शिक्षण आणि आरोग्य सुविधांची वानवा आहे. या रेल्वेमुळे विद्यार्थी, नोकरदार, व्यापारी यांच्यासह सर्वसामान्य नागरिकांना पुण्याशी जोडता येणार आहे. "डीएमयू' सेवेमुळे एक ते दीड तासामध्ये आणि अल्पखर्चात पुण्यात येता येईल.''

दौंड व बारामतीवरून येणाऱ्या 40 हजार लोकांना "डीएमयू'मुळे दिलासा मिळणार आहे. याचे वेळापत्रक निश्‍चितीसाठी नागरिकांच्या सोयीच्या वेळा आम्ही रेल्वे प्रशासनाला दिल्या आहेत. प्रशासनाने त्याचा विचार करून अंतिम वेळापत्रक जाहीर करावे.
- विकास देशपांडे, सदस्य, पुणे-दौंड प्रवासी संघटना

दौंड, बारामतीसह ग्रामीण भागातील प्रवाशांना पुणे शहरात येण्यासाठी "डीएमयू' सेवा फायदेशीर ठरेल. नागरिकांच्या सोयीच्या पाच वेळांची यादी आम्ही रेल्वे प्रशासनाला दिली आहे. त्यानुसार अंतिम वेळापत्रक जाहीर करावे, अशी विनंतीही केली आहे.
- हर्षा शहा, अध्यक्ष, रेल्वे प्रवासी संघटना

1 तास 35 मिनिटांत दौंड
पुणे-दौंड डीएमयू गाडीच्या आत्तापर्यंत पाच "ट्रायल रन' झाल्या आहेत. त्यात 1 तास 35 मिनिटांमध्ये दौंड- पुणे (एकूण 74 किमी) हे अंतर कापणे शक्‍य झाले आहे, असे "डीएमयू'चे ड्रायव्हर (चीफ लोको इन्स्पेक्‍टर) मनोज तिवारी आणि अजय वावरे यांनी "सकाळ'शी बोलताना सांगितले.

"डीएमयू'ची वैशिष्ट्ये
- डीएमयूचे एकूण डब्बे - 14
- वातानुकूलित डब्बे - 2
- आसन क्षमता - 1 हजार 81
- मागे-पुढे दोन पॉवर कार (इंजिन)
- पुणे ते दौंडदरम्यान 9 स्थानक
- बायो टॉयलेटची सुविधा

Web Title: dmu need a convenient time