निवडणूक प्रक्रियेत हलगर्जीपणा नको - सहारिया 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 फेब्रुवारी 2017

पुणे - ""निवडणूक प्रक्रियेत विशेषत: अर्जांची छाननी आणि माघारीच्या प्रक्रियेत कोणत्याही त्रुटी ठेवू नका. जेणेकरून उमेदवारांमध्ये गोंधळ निर्माण होईल. त्यासाठी आवश्‍यक तेवढी यंत्रणा वापरा. या प्रक्रियेत हलगर्जीपणा करू नका,'' असा सूचनावजा आदेश राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया यांनी महापालिकेच्या निवडणूक विभागातील अधिकाऱ्यांना सोमवारी दिला. 

पुणे - ""निवडणूक प्रक्रियेत विशेषत: अर्जांची छाननी आणि माघारीच्या प्रक्रियेत कोणत्याही त्रुटी ठेवू नका. जेणेकरून उमेदवारांमध्ये गोंधळ निर्माण होईल. त्यासाठी आवश्‍यक तेवढी यंत्रणा वापरा. या प्रक्रियेत हलगर्जीपणा करू नका,'' असा सूचनावजा आदेश राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया यांनी महापालिकेच्या निवडणूक विभागातील अधिकाऱ्यांना सोमवारी दिला. 

निवडणूक प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक राहावी, यासाठी पुढील महिनाभर यंत्रणा अधिकाधिक सक्षम ठेवण्याच्या सूचनाही सहारिया यांनी दिल्या. महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर सहारिया सोमवारी पुण्यात आले होते. त्यांनी महापालिकेच्या निवडणूक विभागातील अधिकाऱ्यांशी चर्चा केली. 

शनिवारी सकाळी सुरू झालेली छाननी प्रक्रिया तिसऱ्या दिवशी म्हणजे, सोमवारी सकाळीही संपली नव्हती. त्यातच, उमेदवारांच्या आक्षेपांमुळे या प्रक्रियेत गोंधळ निर्माण झाल्याच्या घटना घडल्या. या संदर्भात राज्य निवडणूक आयोगाकडेही तक्रारी केल्या आहेत. या पार्श्‍वभूमीवर सहारिया यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा केली. 

सहारिया म्हणाले, ""निवडणूक प्रक्रियेत कोणताही गोंधळ होऊ नये, यासाठी यंत्रणा उभारण्यात आलेली आहे. तिच्या माध्यमातून निवडणूक कार्यक्रमाची प्रभावीपणे अंमलबजावणी झाली पाहिजे. त्यासाठी त्या-त्या विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांशी रोजच्या रोज बैठका घेऊन कामाचा आढावा घ्यावा. याच्या सूचना संबंधितांना दिल्या आहेत.'' 

कामात अडथळा येत असल्याच्या तक्रारी 
महापालिका निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाल्यापासून संबंधित निवडणूक कार्यालयाचे अधिकारी आणि राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांमध्ये वादाच्या घटना घडत आहेत. अर्ज दाखल करण्याबरोबरच अर्ज छाननी प्रक्रियेदरम्यान या घटना घडल्या आहेत. त्यामुळे पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते कामात अडथळा आणत असल्याच्या तक्रारी निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया यांच्याकडे निवडणूक विभागातील अधिकाऱ्यांनी केल्याचे सूत्रांनी सांगितले. 

महापालिका निवडणुकीत आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी करण्याचा आदेश राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया यांनी सोमवारी दिला. तसेच, पुढील पंधरा दिवस मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जनजागृती करावी, या निवडणुकीत मतदानाची टक्‍केवारी वाढावी, असे आवाहनही सहारिया यांनी केले. या बैठकीला निवडणूक आयोगाचे सचिव शेखर चित्रे, विभागीय आयुक्त एस. चोक्कलिंगम, जिल्हाधिकारी सौरभ राव, पोलिस आयुक्त रश्‍मी शुक्‍ला, पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे आदी या वेळी उपस्थित होते. 

Web Title: Do not default the election process