जुन्या वाहनांची नको चिंता!

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 6 नोव्हेंबर 2019

पुणे-  वाहन वापरून १५ वर्षांपेक्षा जास्त कालावधी झाला? त्यांची विल्हेवाट लावायची आहे?... तर आता त्यासाठी केंद्र सरकारच्या योजनेतून शहरात स्क्रॅप सेंटर उभारणार आहे. हे सेंटर प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (आरटीओ) देखरेखीखाली असेल. तेथे वाहन घेऊन गेल्यानंतर ते स्क्रॅप केले जाईल. मग तुमचे वाहन दुचाकी असो अथवा चारचाकी. 

पुणे-  वाहन वापरून १५ वर्षांपेक्षा जास्त कालावधी झाला? त्यांची विल्हेवाट लावायची आहे?... तर आता त्यासाठी केंद्र सरकारच्या योजनेतून शहरात स्क्रॅप सेंटर उभारणार आहे. हे सेंटर प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (आरटीओ) देखरेखीखाली असेल. तेथे वाहन घेऊन गेल्यानंतर ते स्क्रॅप केले जाईल. मग तुमचे वाहन दुचाकी असो अथवा चारचाकी. 

भंगार झालेल्या वाहनांची विल्हेवाट लावण्यासाठी शासकीय अथवा अधिकृत व्यवस्था सध्या नाही. पोलिसांकडे जमा झालेल्या किंवा महापालिकेला रस्त्यावर सापडलेल्या भंगार वाहनांचा लिलाव करून त्यांची विल्हेवाट सध्या लावली जाते; परंतु नागरिकांना त्यांच्याकडील जुने वाहन नष्ट करायचे असेल तर, त्यासाठी मदत करण्यासाठी केंद्र सरकारने स्क्रॅप सेंटरचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. केंद्र उभारण्यासाठीच्या सूचनांचा आराखडा केंद्रीय वाहतूक मंत्रालयाने तयार केला आहे. मंत्रालयाच्या संकेतस्थळावरही तो प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्यावर नागरिकांनी १५ नोव्हेंबरपर्यंत सूचना द्याव्यात, असे आवाहन वाहतूक मंत्रालयाने केले आहे. 

केंद्र सरकारने तयार केलेल्या आराखड्यानुसार वाहनाची विल्हेवाट लावण्यापूर्वी नागरिकांनी ‘आरटीओ’कडून ना हरकत प्रमाणपत्र घ्यायचे आहे. ते त्या केंद्रात दाखवून वाहन जमा करायचे. त्यासाठी थोडे शुल्क नागरिकांना द्यावे लागेल. वाहन जमा केल्यावर त्याची पावती नागरिकांना दिली जाणार आहे. तसेच वाहन जमा करणाऱ्या नागरिकाचे छायाचित्रही काढून घेण्यात येणार आहे. वाहन जमा करण्यापूर्वी करांची थकबाकीही वाहनचालकाला भरावी लागणार आहे. 

वाहनांची विल्हेवाट लावण्यासाठी स्क्रॅप सेंटर उभारण्यासाठी केंद्र सरकारने आराखडा तयार केला आहे. त्याची पुण्यातही अंमलबाजवणी होईल. भंगार वाहनांची समस्या सुटण्यासाठी हे केंद्र उपयुक्त ठरेल.
-अजित शिंदे, प्रादेशिक परिवहन अधिकारी 

माझ्याकडे जुनी एम-५० आहे. या गाडीचे करायचे काय, असा प्रश्‍न पडल्यामुळे ती आमच्या सोसायटीत धूळ खात पडली आहे. विल्हेवाट लावण्यासाठी केंद्र लवकर झाल्यास माझ्यासमोरील प्रश्‍न सुटेल.
-सुजित परदेशी, नागरिक 

भंगार वाहनांची विल्हेवाट लावण्यासाठी केंद्र सरकार सेंटर सुरू करणार, ही बाब चांगली आहे. मात्र, त्यात ‘आरटीओ’ची आटोपशीर प्रक्रिया असावी. शुल्कही माफक असावे. 
- हरीश अनगोळकर, गॅरेज व्यावसायिक


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Do not worry about old vehicles