डॉक्‍टर-रुग्ण संवादात एक पाऊल पुढे

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 3 डिसेंबर 2018

पुणे - माझ्या मुलीच्या पायाचं फ्रॅक्‍चर झालं. मी तिला एका कॉर्पोरेट हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्‍टर मित्राने सांगितलं, की तिच्यासाठी जी प्लेट वापरली जाणार आहे, तिची किंमत पन्नास हजार रुपये आहे. मी मान्य केलं. पण रुग्णालय सोडताना जेव्हा एक लाख ७५ हजार रुपयांचं बिल हातात पडलं, तेव्हा मला धक्काच बसला... ज्येष्ठ स्त्रीरोग व प्रसूतितज्ज्ञ डॉ. अरुण गद्रे यांचा हा अनुभव आपल्यापैकी अनेकांच्या वाट्याला आला असेल.

रुग्णालयाच्या बिलात पारदर्शकता नसते. आपल्याला डॉक्‍टर काही सांगतात आणि रुग्णालयाचं व्यवस्थापन काही सांगतं. अनेकदा त्या दोहोंमध्ये तफावत असते. खरं काय? मग एकूणच डॉक्‍टरांबद्दल, रुग्णालयांबद्दल शंका निर्माण होतात. डॉ. गद्रे आणखी एक अनुभव सांगतात. दुसऱ्या टोकाचा. त्यांच्याच डॉक्‍टर मित्राचा.

तीस वर्षं अत्यंत सचोटीने प्रॅक्‍टिस केली. कोणत्याही औषध कंपनीचे पैसे घेतले नाहीत आणि कट प्रॅक्‍टिसही केली नाही; पण आता मी घाबरायला लागलोय. सगळं वातावरण अविश्‍वासाचं बनलंय. पेशंट संशयी झाले आहेत. एखाद्या बड्या हॉस्पिटलला ‘ॲटॅच’ व्हावं, तर तिथे डॉक्‍टरांना ‘टार्गेट्‌स’ दिली जातात! ते मला बिलकूल पटत नाही, तो मित्र सांगतो. आताच्या वातावरणात रुग्णांचं, डॉक्‍टरांचं आणि खरंतर समाजाचं नुकसान होत आहे. ते टाळण्यासाठी गेली दीड वर्षं ‘पूना सिटिझन डॉक्‍टर फोरम’ (पीसीडीएफ) काम करीत आहे. सचोटीनं काम करू इच्छिणारे डॉक्‍टर आणि समंजस नागरिक यांनी या फोरमखाली एकत्र येऊन, अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. 

डॉक्‍टर- रुग्ण संवादातील एक महत्त्वाचा उपक्रम येत्या शुक्रवारी (ता. ७) होत आहे. स्त्रीरोग व प्रसूतितज्ज्ञ संघटनेचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. संजय गुप्ते व त्यांच्या सहकाऱ्यांनी सुरू केलेली ‘अस्मिता फाउंडेशन’ ‘पीसीडीएफ’ आणि ‘कोअर इंडिया क्‍लिनिक’च्यावतीनं त्या दिवशी संध्याकाळी ६ वाजता पत्रकार भवनात एक आगळा कार्यक्रम होणार आहे. रुग्ण आणि डॉक्‍टर व रुग्णालय यांचे परस्पर संबंध अधिक पारदर्शी करण्यासाठीच्या उपायांवर चर्चा होईल. तसेच, एक ठोस कृती आराखडाही जाहीर केला जाईल. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असेल.

आज फेसबुक लाइव्ह
रुग्णालयांनी उपचारांच्या खर्चाचा अंदाज दिलेला असतो. पण, त्यापेक्षा खूप जास्त खर्च येतो. तुम्हालाही असाच अनुभव आला आहे? तर मग डॉक्‍टर- रुग्ण संवादात तुम्हीदेखील नक्की सहभागी व्हा. तुमच्याशी या विषयावर ‘पीसीडीएफ’चे डॉ. अरुण गद्रे ‘सकाळ’ फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून उद्या (सोमवारी) दुपारी चार वाजता थेट संवाद साधणार आहेत. यात आपणही सहभागी व्हा.

Web Title: Doctor Patient Discussion