कुणी नोकरी देता का नोकरी?

संतोष शाळिग्राम 
रविवार, 22 जुलै 2018

पुणे - व्यावसायिक अभ्यासक्रम पूर्ण करूनही नोकरीसाठी वणवण करणाऱ्या तरुणांची संख्या झपाट्याने वाढत आहे. पुण्यात शुक्रवारी झालेल्या रोजगार मेळाव्यात तब्बल ५० हजार जणांनी हजेरी लावल्याने राज्यात बेरोजगारीचा ‘पूर’ आल्याचे स्पष्ट झाले. त्यातील ३२ हजार ९०० जणांच्या मुलाखती झाल्या; पण नोकरीसाठी ऑफर लेटर मात्र ३५५ उमेदवारांनाच मिळाले.

पुणे - व्यावसायिक अभ्यासक्रम पूर्ण करूनही नोकरीसाठी वणवण करणाऱ्या तरुणांची संख्या झपाट्याने वाढत आहे. पुण्यात शुक्रवारी झालेल्या रोजगार मेळाव्यात तब्बल ५० हजार जणांनी हजेरी लावल्याने राज्यात बेरोजगारीचा ‘पूर’ आल्याचे स्पष्ट झाले. त्यातील ३२ हजार ९०० जणांच्या मुलाखती झाल्या; पण नोकरीसाठी ऑफर लेटर मात्र ३५५ उमेदवारांनाच मिळाले.

आरटीओ कार्यालयाजवळील ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरिअल सोसायटी, जिल्हा रोजगार कार्यालय आणि सॉफ्टझील कंपनीने आयोजित केलेल्या या रोजगार मेळाव्यात १४७ कंपन्या सहभागी झाल्या होत्या. त्यात सुमारे आठ हजार जागांसाठी मुलाखती घेतल्या जाणार होत्या. त्यासाठी सुमारे दहा हजार उमेदवार येतील, असे गृहीत धरून नियोजन करण्यात आले. परंतु राज्यात आजवर झालेल्या सर्वच रोजगार मेळाव्यांचे रेकॉर्ड मोडणारा ‘महापूर’ लोटल्यामुळे रस्त्यावर वाहनांची कोंडी झाली. 

महाविद्यालयांतून हजारो विद्यार्थी अभियांत्रिकीसह व्यावसायिक पदवी घेऊन बाहेर पडतात. मात्र तेवढ्या नोकऱ्या नसल्यामुळे सुशिक्षित बेरोजगारांची संख्या प्रचंड वाढत आहे. वर्षानुवर्षे अभ्यासक्रम न बदलल्याने घेतलेले शिक्षण आणि उद्योगांना हवे असलेले कौशल्य यात मोठी दरी पडली आहे. विद्यार्थ्यांनी उद्योगांच्या गरजेनुसार कौशल्ये आत्मसात केली पाहिजेत.   
- दौलत बाफना, रोजगार मेळाव्याचे संयोजक

मेळाव्याला अभूतपूर्व गर्दी झाली. दोन वर्षांपूर्वी अमरावतीला झालेल्या मेळाव्याला १७ हजार जण आले होते. वाढती बेरोजगारी आणि सोशल मीडियावरून झालेला प्रसार यामुळे राज्यातील सर्व रोजगार मेळाव्यांचे रेकॉर्ड या मेळाव्याने मोडले आहेत. 
- अनुपमा पवार, सहसंचालक, जिल्हा रोजगार कार्यालय

नियोजन कोलमडले
कंपनीच्या प्रत्येक अधिकाऱ्यापुढे किमान एक हजार विद्यार्थ्यांची रांग असल्याने त्यांना मुलाखती घेणेही मुश्‍कील झाले. त्यामुळे रोजगार कार्यालयाचे नियोजन कोलमडले. कंपन्यांना मुलाखतीसाठी जादा मनुष्यबळ बोलवावे लागले.

उपस्थिती कुणाची?
जिल्हा रोजगार कार्यालयाच्या माहितीनुसार तंत्र शिक्षण पदविका, अभियांत्रिकी पदवी, औषधनिर्माणशास्त्र पदवी, एमबीए झालेल्यांना नोकरीची संधी होती. पण एकूण उपस्थितांपैकी ८० टक्के उमेदवार हे अभियांत्रिकी पदवीधर आणि एमबीए झालेले होते.

Web Title: Does anyone employ a job