दलदलीत अडकलेल्या कुत्रीला मिळाले जीवदान

गणेश बोरुडे
गुरुवार, 27 डिसेंबर 2018

तळेगाव स्टेशन : वन्यजीव रक्षक मावळ संस्थेच्या स्वयंसेवकांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून दाखविलेल्या भूतदयेमुळे तळेगावात पडक्या विहिरीच्या दलदलीत पडून फसलेल्या अर्धांग वायूने पछाडलेल्या चिनू कुत्रीला जीवदान मिळाले.

तळेगाव स्टेशन : वन्यजीव रक्षक मावळ संस्थेच्या स्वयंसेवकांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून दाखविलेल्या भूतदयेमुळे तळेगावात पडक्या विहिरीच्या दलदलीत पडून फसलेल्या अर्धांग वायूने पछाडलेल्या चिनू कुत्रीला जीवदान मिळाले.

एका मुलगा सोमवारी (ता.२४) दुपारी चारच्या सुमारास वन्यजीव रक्षक संस्था मावळचे स्वयंसेवक निलेश गराडे यांना विहिरीत पडून एक कुत्रे जगण्यासाठी तडफडत असल्याचा सांगावा देऊन गेला. गराडे यांनी त्वरित संत तुकाराम नगरमधील पडक्या त्या विहिरीकडे धाव घेतली. इतर कुत्री मागे लागल्याने बहुदा विहरीत पडलेली ती कुत्री सकाळी अकरा वाजल्यापासून ते दुपारी चार वाजेपर्यंत विहिरीच्या दलदलीत फसल्याने बाहेर पडण्यासाठी धडपडत होती.

थंडीचे दिवस असल्यामुळे थंड पाण्यामुळे ती कुत्री कुडकुडत जिवाच्या आकांताने विव्हळत होती. कौस्तुभ अंजनकर, निनाद काकडे, हर्षद गरुड आदी सहकाऱ्यांच्या मदतीने गराडे यांनी दोर फेकत त्या कुत्रीला बाहेर काढण्याचा खूप प्रयत्न केला पण यश आले नाही.

काटेरी झाडेझुडुपे आणि गवताने गराडा घातलेल्या त्या पडक्या विहिरीत खूप गाळ आणि दलदल असल्यामुळे जास्त पुढे जाणे धोक्याचे होते. शेवटी सुचलेल्या कल्पनेनुसार जेसीबी मशीन आणून त्याच्या बकेटच्या साहाय्याने फसलेल्या कुत्रीला बाहेर काढायचे ठरले. सामाजिक कार्यकर्ते विशाल भेगडे यांच्या सहकार्याने जेसीबी मागवला गेला. मात्र जेसीबीच्या बकेटमध्ये यायला ती काही तयार होईना. तोल जाऊन विहिरीत पडण्याचा धोका असतानाही, शेवटी निनाद काकडे याने धाडस करत बकेटवर चढून जीव धोक्यात घालत एका दोरखंडाच्या साह्याने कुत्रीला बकेटकडे ओढून,पकडून ठेवत दलदलीतून सुखरुप बाहेर काढले.

निरीक्षणाअंती त्या कुत्रीच्या पार्श्वभागासह मागील दोन्ही पायांना अर्धांगवायू झाल्याचे लक्षात आले. थंडीमुळे कुडकुडलेल्या त्या कुत्रीला नंतर शालीने लपेटून कोरडे करत उब देण्यात आली. सदर घटनेची माहिती कळाल्यानंतर दोन तासांनी अस्मिता सावंत नावाची तरुणी तिकडे पोहोचली.

कुडकुडलेल्या कुत्रीला पाहून तीने "चिनू" म्हणून हाक मारताच जगण्याच्या नव्या उमेदीने ती कुत्री फरफटत का होईना उठली. दोन वर्षांपूर्वी अर्धांगवायुने पछाडलेल्या आणि रस्त्याच्या कडेला सापडलेल्या या भटक्या कुत्रीचा अस्मिता सांभाळ करीत आहे. अस्मिता वन्यजीवरक्षक मावळ्यांना धन्यवाद देत अस्मिता चिनूला बरोबर घेत निघून गेली. अमाप भटक्या कुत्र्यांच्या त्रासाने वैतागलेल्या तळेगावातील प्राणिमित्रांनी दलदलीत फसलेल्या कुत्रीला जीवदान देण्यासाठी दाखविलेले हे भूतदयेचे मूर्तीमंत उदाहरण साहजिकच नागरिकांच्या चर्चेचा विषय ठरले.

Web Title: dog rescued from extreme muddy area

टॅग्स