esakal | आधीच आर्थिक चणचण, त्यात चाचणीच्या खर्चाची भर; घरेलू कामगार अडचणीत
sakal

बोलून बातमी शोधा

Domestic helpers

आधीच आर्थिक चणचण, त्यात चाचणीच्या खर्चाची भर; घरेलू कामगार अडचणीत

sakal_logo
By
टीम सकाळ

हेही वाचा: कुंभमेळा म्हणजे कोरोनाचा बॉम्ब; दिग्दर्शक राम गोपाल वर्मांची पोस्ट

पुणे : शहरात असंख्य हाउसिंग सोसायटीमध्ये लाखो नागरिक राहत असून, त्यातील बहुतांश नोकरी करत आहेत. तर घरकाम आणि सोसायटीच्या देखभालीसाठी विविध कामगारांची गरज असते. कोरोनाचे वाढते संकट पाहता, कामगारांसाठी कोरोना चाचणी बंधनकारक करण्यात आली. मात्र, चाचणीचा खर्च, चाचणीबाबत संभ्रम व त्यामुळे निर्माण होणाऱ्या असुविधांची व्यथा कामगारांकडून सांगण्यात येत आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्यावतीने जारी केलेल्या आदेशानुसार हाउसिंग सोसायटीमध्ये नियमित येणाऱ्या कामगारांना भारत सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार लसीकरण करणे किंवा १५ दिवसांची वैधता असलेले आरटीपीसीआर प्रमाणपत्र सोबत ठेवण्याचे अनिवार्य असल्याचे निर्देश दिले आहेत. यामध्ये प्रामुख्याने घरेलू कामगार, कचरा वेचक, चालक, सुरक्षा रक्षक अशा असंघटित कामगारांचा समावेश आहे. या घटकाचे उत्पन्न पाहता १५ दिवसांनी आरटीपीसीआर करणे, हे नक्कीच परवडणारे नाही. त्या तुलनेत अॅटिजिन टेस्टचे दर कमी आहेत. त्यामुळे अँटिजिन टेस्ट चांगला पर्याय ठरू शकतो, असे पुणे जिल्हा घरकामगार संघटनेचे अध्यक्ष किरण मोघे यांनी सांगितले.

कामगारांची समस्या :

  • पगाराची चणचण असल्यामुळे प्रत्येक १५ दिवसांनी कोरोना चाचणीचा खर्च न परवडणारा

  • आरटीपीसीआरच्या तपासणीचा अहवालासाठी लागणारा वेळ

  • अहवाल येईपर्यंत कामाला जाण्यास अडचण

  • पीएमटी चालू की बंद ही संभ्रम अवस्था

  • वयमर्यादामुळे लस घेण्यास अडचणी

''हाउसिंग सोसायटीतील नियमित कामगारांना आरटीपीसीआर किंवा अँटिजिन या दोन्हीपैकी कोणतीही चाचणी आवश्यक आहे. अँटिजिन टेस्टची सवलतसुद्धा आता देण्यात आली आहे. १५ दिवसांची वैधता असलेल्या आरटीपीसीआरचा हा कालावधी तितकाच असेल. त्यात कोणतेही बदल नाही.''
विक्रम कुमार, आयुक्त, पुणे महापालिका

''सध्या सोसायटीच्या देखभालीचे काम करतोय व माझी पत्नी सोसायटीतील काही घरांमध्ये काम करते. त्यामुळे दोघांनाही आदेशाप्रमाणे पुन्हा १५ दिवसांनी चाचणी करावी लागणार. घरभाडे, मुलांचा खर्च या सगळ्या गोष्टींसाठी सतत तडजोड करत असताना आणखीन एक भर. तसेच लसीकरणासाठी वय बसत नाही.''
दिनेश सिंह, कामगार

''बहुतांश घरेलू कामगार तीन ते चार घरांचे काम करतात. त्यामुळे नियमितपणे ये जा होत असल्याने टेस्ट निगेटिव्ह आल्यानंतरही पुढील चाचणीपर्यंत त्यांना संसर्ग होण्याची शक्यता आहे. दरम्यान सोसायटीत प्रवेश करताना या कामगारांचे शरीराचे तापमान, ऑक्सिजनची पातळी न चुकता पाहिली जाते.''
हर्षद अभ्यंकर, रहिवासी