दानपेटीतील बंद नोटांची माहिती मागविणार

सुधीर साबळे
मंगळवार, 6 डिसेंबर 2016

पिंपरी - केंद्र सरकारने नोटाबंदीचा निर्णय जाहीर केल्यानंतर देवस्थानांच्या दानपेटीत पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा येत आहेत. त्यामुळे प्राप्तिकर खात्याने सर्वच देवस्थानांची माहिती मागवण्याचे निश्‍चित केले आहे. येत्या काही दिवसांमध्ये देवस्थानांना त्यासंदर्भात पत्रे पाठवण्यात येणार असल्याचे प्राप्तिकर खात्याच्या अधिकाऱ्याने "सकाळ'शी बोलताना स्पष्ट केले.

काही दिवसांपूर्वी प्राप्तिकर खात्याने शिर्डी येथील साईबाबा देवस्थान आणि पंढरपुरातील विठ्ठल-रुक्‍मिणी देवस्थान यांना त्यासंदर्भात पत्र पाठवले आहे.

पिंपरी - केंद्र सरकारने नोटाबंदीचा निर्णय जाहीर केल्यानंतर देवस्थानांच्या दानपेटीत पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा येत आहेत. त्यामुळे प्राप्तिकर खात्याने सर्वच देवस्थानांची माहिती मागवण्याचे निश्‍चित केले आहे. येत्या काही दिवसांमध्ये देवस्थानांना त्यासंदर्भात पत्रे पाठवण्यात येणार असल्याचे प्राप्तिकर खात्याच्या अधिकाऱ्याने "सकाळ'शी बोलताना स्पष्ट केले.

काही दिवसांपूर्वी प्राप्तिकर खात्याने शिर्डी येथील साईबाबा देवस्थान आणि पंढरपुरातील विठ्ठल-रुक्‍मिणी देवस्थान यांना त्यासंदर्भात पत्र पाठवले आहे.

पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा बंद केल्यानंतर अनेक जण त्या देवस्थानांच्या दानपेटीत टाकत आहेत. त्यामुळे नेहमीच्या तुलनेत देवस्थानांच्या दानपेटीतील पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटांचे प्रमाण वाढले आहे. देवस्थानांकडे जमा होणाऱ्या नोटांचा लेखाजोखा त्यांनी ठेवायचा आहे. प्राप्तिकर खात्याचे पत्र मिळाल्यानंतर त्यासंदर्भातील खुलासा संबंधित देवस्थानांनी करायचा आहे, असेही या अधिकाऱ्याने स्पष्ट केले.

पाचशे आणि एक हजार रुपयांच्या जुन्या नोटा बॅंकांमध्ये भरण्यासाठी 30 डिसेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. पेट्रोलपंपांवर जुन्या नोटा स्वीकारणे बंद करण्यात आले आहे. त्यामुळे जुन्या नोटा देवस्थानांच्या दानपेटीत टाकल्या जात आहेत. देवस्थानांकडे येणाऱ्या या रकमेची माहिती मिळण्यासाठी प्राप्तिकर खात्याने देवस्थानांना पत्र पाठवण्यास सुरवात केली आहे. त्यामध्ये मोठ्या देवस्थानांबरोबरच मध्यम आणि लहान देवस्थानांचाही समावेश असणार आहे, असेही त्यांनी नमूद केले.

'चिंचवड देवस्थानच्या अखत्यारित सिद्धटेक, मोरगाव आणि थेऊर येथील मंदिरे येतात. नोटाबंदीचा निर्णय झाल्यानंतर येथील दानपेटीत येणाऱ्या पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटांची माहिती देवस्थानने ठेवली आहे.

दानपेटीत जमा होणारी रक्‍कम देवस्थानच्या बॅंक खात्यात जमा करण्यात येते. आता दानपेटीत पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा येणे बंद झाले आहे. मोरगाव, सिद्धटेकमधील दानपेटीत एखाद दुसरी पाचशे व हजार रुपयाची नोट येते. यासंदर्भात प्राप्तिकर खात्याची नोटीस आल्यास त्याला उत्तर देऊ.''

- मंदारदेव महाराज, मुख्य विशवस्त, चिंचवड देवस्थान.

'दानपेटीत पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा येण्याचे प्रमाण खूपच कमी आहे. प्रामुख्याने कष्टकरी, मध्यमवर्गीय वर्ग संत तुकाराम महाराजांच्या दर्शनासाठी येत असतो. त्यामुळे दानपेटीत शंभर, दहा, वीस रुपयांच्या नोटा आणि पाच रुपयांची नाणी जमा होतात. ही रक्‍कम देवस्थानच्या बॅंक खात्यात जमा करण्यात येते. नोटाबंदीनंतर दानपेटीत जमा झालेल्या पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटांचा तपशील देवस्थानने ठेवला आहे. प्राप्तिकर खात्याकडून कोणतीही नोटीस आल्यास त्याला योग्य ते उत्तर दिले जाईल.''
- रामभाऊ मोरे, विशवस्त, देहू देवस्थान.

'नोटाबंदीचा निर्णय झाल्यानंतर दोन ते तीन दिवस दानपेटीत पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा आल्या होत्या; मात्र त्याचे प्रमाण बोटावर मोजण्या इतके होते. नुकतीच आळंदी यात्रा झाली. त्यामध्ये जुन्या नोटा आल्या नाहीत. नोटाबंदीचा निर्णय ज्या दिवशी झाला, त्याच दिवशी आम्ही देणग्या स्वीकारण्याचे बंद केले. देवस्थानच्या सर्व व्यवहारांची नोंद ठेवलेली आहे. त्यामुळे प्राप्तिकर खात्याकडून नोटीस आलीच तर त्याला उत्तर देऊ.''
- डॉ. अजित कुलकर्णी, अध्यक्ष, आळंदी देवस्थान

Web Title: donation box currency information