कोरोनाला व्हायरसला घाबरू नका; अशी घ्या काळजी

सकाळ वृत्तसेवा
Friday, 31 January 2020

  • कोरोनाला घाबरू नका, प्रतिबंधात्मक बाबी पाळा
  • सर्दी, खोकला ताप असेल तर काळजी घ्या

पुणे : चीनमध्ये अनेक बळी घेणा-या कोरोना या विषाणूजन्य आजाराचा एकही पॉझिटिव्ह रुग्ण अद्याप राज्यात आढळलेला नाही. तर संशयितांवर योग्य ते उपचार करण्यात येत आहे. त्यामुळे या आजाराला घाबरून न जाता योग्य ती काळजी घेणे व प्रतिबंधात्मक बाबी पाळणे गरजेचे आहे. तसेच सर्दी, खोकला, ताप आणि श्‍वासोच्छवासात अडथळा निर्माण होत असेल तर योग्य वेळी डॉक्‍टरांकडे जाणेच योग्य राहील. आपण आपल्यापरीने या आजाराची काळजी घेऊ शकतो आणि काही उपाय देखील करू शकतो.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

अशी घ्या काळजी
- सार्वजनिक ठिकाणी किंवा रस्त्यावर थुंकू नका
- आजारी प्राण्यांबरोबर थेट संपर्क व प्रवास टाळा
- पूर्णपणे शिजवलेले अन्न खावे
- शिंकताना, खोकताना नाका-तोंडावर रुमाल धरावा
- प्ल्युची लक्षणे असल्यास नजीकचा संपर्क नको
- मांस व अंडी पूर्णपणे शिजवून व उकडून खावे
- जंगली व पाळीव प्राण्यांशी निकटचा संपर्क टाळा

भारतात कोरोना विषाणूचा पहिला बळी; केरळमध्ये आढळला रुग्ण

स्वच्छ हात धुवा
खोकल्यावर, शिंकल्यानंतर, आजारी व्यक्तीची काळजी घेताना, स्वयंपाक करण्यापूर्वी, जेवण तयार करताना, स्वयंपाक झाल्यानंतर, जेवणापूर्वी, शौचानंतर आणि प्राण्याचा सांभाळ केल्यानंतर आणि त्यांची विष्ठा काढल्यानंतर साबणाने स्वच्छ हात धुणे गरजेचे आहे.

लक्षणे आढळले तर हे करा
कोरोनाची लक्षणे आढळल्यास पुण्यातील नायडू रुग्णालय (दूरध्वनी क्र. 202-25506300), मुंबईतील कस्तुरबा रुग्णालय (दूरध्वनी- 022-23027769) किंवा राष्ट्रीय कॉल सेंटर क्र.- 91-11-23978046, राज्यस्तरीय नियंत्रण कक्ष क्र.- 020-26127394 आणि टोल फ्री हेल्पलाइन क्र.- 104 वर संपर्क करावा. या ठिकाणी विलगीकरण कक्षात संशयितांसाठी आवश्‍यक त्या सर्व सोयी उपलब्ध करण्यात आल्या आहेत.

खरंच, पाकिस्तानातील गैरमुस्लिमांची संख्या २३% वरुन ३.७%वर घसरली का?

आरोग्यखाते आणि इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) तर्फे कोरोना व्हायरसबाबत सर्वत्र जनजागृती केली जात आहे. संशयास्पद रुग्णांना त्वरित रुग्णालयात भरती करून त्यांना स्वतंत्र ठेवण्याची व्यवस्था केली जात आहे. अत्यवस्थेत एखादा रुग्ण दाखल झाल्यास त्यासाठी लागणारी सर्व उपकरणे, औषधे आणि कर्मचारी यांचे काटेकोरपणे नियोजन आणि व्यवस्था केली गेली आहे. नागरिकांनी प्रतिबंधक तत्त्वांचे पालन केले तर सद्यःस्थितीत हा आजार पसरण्याची शक्‍यता नाही. दुर्दैवाने काही बाधित रुग्ण आढळल्यास त्यांच्या उपचाराने ते बरे होतील आणि आजार न पसरता आटोक्‍यात राहील. - डॉ. अविनाश भोंडवे, राज्य अध्यक्ष, आयएमए


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dont be afraid of the Corona virus Take care of this way