इन्स्टंट म्युझिक नकोच, रियाज हवा! - इर्शाद खान

स्वप्नील जोगी -  @swapjogi_sakal
बुधवार, 7 डिसेंबर 2016

पुणे  - ‘‘आजच्या तरुणांना शास्त्रीय संगीत शिकावंसं वाटतंय खरं; पण त्यांना सगळ्या गोष्टी कशा ‘इन्स्टंट’ हव्या आहेत. हे कसं बरं होऊ शकेल?... थोडंफार काहीतरी शिकलं की आजकाल ज्याला-त्याला लगेच स्टेज परफॉर्मन्सच द्यायची घाई असल्याचं दिसतं; पण हा दृष्टिकोन योग्य नाही. आपण जे काही शिकतोय, त्याचा रियाज नको का करायला? लक्षात असू द्या, हा रियाझच तुम्हाला खूप पुढे नेऊ शकेल. मंचावर तर प्रत्येकालाच कधी न कधी यायचं आहेच...’’ शास्त्रीय संगीतातील अनुभवाचे हे बोल आहेत इमदादखानी इटावा घराण्याचे ख्यातनाम सतार व सूरबहारवादक उस्ताद इर्शाद खान यांचे.

यंदाच्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाच्या पहिल्या दिवशी, बुधवारी इर्शाद यांचे सादरीकरण रसिकांना अनुभवता येणार आहे. त्यानिमित्त ‘सकाळ’ने त्यांच्याशी संवाद साधला. या वेळी त्यांनी विविध विषयांवर मनमोकळेपणाने आपली मतं मांडली. इर्शाद यंदा चौथ्यांदा ‘सवाई’त आपली कला सादर करणार आहेत. ऐंशीच्या दशकात वयाच्या अवघ्या चौदाव्या वर्षी त्यांनी या मंचावर पहिल्यांदा सादरीकरण केलं होतं. त्या वेळी त्यांनी पेश केलेल्या ‘दरबारी कानडा’ला रसिकांनी दिलेल्या अभूतपूर्व प्रतिसादाच्या आठवणी आजही त्यांच्या मनात आहेत. गायकी अंगाने सतार आणि सूरबहार वाजवण्यासाठी इमदादखानी इटावा घराणं ओळखलं जातं. इर्शाद या घराण्याच्या आठव्या पिढीतले. अभिजात भारतीय संगीत परंपरेतली अस्सल गायकी सतार वादनातूनही पुढे आणण्याचं कार्य या घराण्याने सतत केलंय.

सूरबहार या वाद्याविषयी ते म्हणाले, ‘‘सतारशी मिळतंजुळतं असलं तरी स्वतःची काही खास वैशिष्ट्ये हे असणारं वाद्य आहे. माझे खापरपणजोबा उस्ताद साहेबदाद खान यांनी तयार केलेलं हे वाद्य. वीणेच्या एका प्रकारापासून सूरबहार निर्मिलं गेलं. माझे पणजोबा उस्ताद इमदाद खान यांनी ही परंपरा आपल्या अत्युच्च साधनेने पुढे नेली. इमदाद खान हे सतार वादनातलेही मोठी हस्ती होती; पण त्यांनी सूरबहारलासुद्धा वेगळं स्थान मिळवून दिलं.’’ सात सुरांची मिंड अनुभवायला देणारं हे एकमेव वाद्य! विशेषतः गंभीर बाजाच्या रागांसाठी आणि वाजवणाऱ्याच्या तयारीची खरी कसोटी पाहण्यासाठी ओळखलं जाणारं. सतारपेक्षाही सुरांची एक अद्वितीय अनुभूती देणारं हे वाद्य असल्याचंही ते म्हणाले.

अभिजात संगीतच आवडते...
इर्शाद म्हणाले, ‘‘फ्युजन किंवा एकाच वेळी इतरही वाद्यांच्या सोबतीने वाजवण्याला माझा थेट विरोध नाही. अलीकडे असं अनेकदा करावं लागतं... रसिकांनाही असं फ्युजन ऐकायला अनेकदा आवडतं हे खरंय; पण व्यक्तिशः मला मात्र हे प्रकार फारसे आवडत नाहीत. 

अभिजात भारतीय संगीत हे त्याच्या अस्सल नितळतेसह (प्युरिटी) सादर केलं जायला हवं, असं माझं स्पष्ट मत आहे. ‘माय सोल इज हॅप्पीएस्ट प्लेइंग प्युअर क्‍लासिकल म्युझिक!’’

Web Title: dont instant music, practive important