रासपमधूनच निवडणूक लढविणार : राहुल कुल

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 20 सप्टेंबर 2019

विधानसभा निवडणुकीत माझ्या उमेदवारीचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर घेणार आहेत. मी भाजपकडे उमेदवारी मागितली नसून महादेव जानकर यांनी माझी उमेदवारी जाहीर केली आहे. मी रासपमधून निवडणूक लढविणार आहे. त्यामुळे भाजपमधील काही कार्यकर्त्यांनी माझ्या उमेदवारीची काळजी करू नये, असा सल्ला दौंडचे आमदार राहुल कुल यांनी दिला.

केडगाव (पुणे) : विधानसभा निवडणुकीत माझ्या उमेदवारीचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर घेणार आहेत. मी भाजपकडे उमेदवारी मागितली नसून महादेव जानकर यांनी माझी उमेदवारी जाहीर केली आहे. मी रासपमधून निवडणूक लढविणार आहे. त्यामुळे भाजपमधील काही कार्यकर्त्यांनी माझ्या उमेदवारीची काळजी करू नये, असा सल्ला दौंडचे आमदार राहुल कुल यांनी दिला.
 
महाजनादेश यात्रेचे जंगी स्वागत आमदार कुल यांनी वरवंड (ता. दौंड) येथे केले होते. मुख्यमंत्री फडणवीस यांनी कुल यांच्या कामकाजाचे कौतुक केले होते. या कौतुकामुळे भाजपचा एक गट काळजीत पडला आहे. भाजपमधील काही कार्यकर्त्यांनी भाजपने आयारामांना उमेदवारी देऊ नये, अशी पोस्ट सोशल मीडियावर टाकली होती. या पोस्टमध्ये राहुल कुल यांचे नाव नसले तरी ही पोस्ट कुल यांना उद्देशून होती, अशी चर्चा आहे. यासंदर्भात दौंड येथे गुरुवारी (ता. 19) भाजपच्या एका गटाने बैठक आयोजित केली होती. मात्र ही बैठक रद्द झाली. याबाबत कुल यांना पत्रकारांनी यवत येथे विचारले असता भाजपच्या कार्यकर्त्यांनी माझ्या उमेदवारीची काळजी करू नये, असा सल्ला कुल यांनी दिला.

भाजपने विधानसभेसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांचे अर्ज मागविले होते. त्यांच्या मुलाखती घेतल्या आहेत. मी भाजपकडे अर्ज केला नाही आणि मुलाखतींना गेलो नाही. त्यामुळे माझ्याबद्दल कोणाला किंतू असण्याचे कारण नाही. लोकसभा निवडणुकीच्या वेळीही आम्ही कांचन कुल यांच्यासाठी उमेदवारी मागितली नव्हती. कांचन कुल यांच्या उमेदवारीच्या निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व आमचे नेते महादेव जानकर यांनी घेतला होता. येत्या विधानसभा निवडणुकीतही माझ्या उमेदवारीबाबत हे दोघेच निर्णय घेणार आहेत. त्यांचा निर्णय मला मान्य राहील.
- राहुल कुल, आमदार, दौंड

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dound Politics Between BJP & RSP