पाटसला रंगली रासप-राष्ट्रवादीची चर्चा

रमेश वत्रे
बुधवार, 25 सप्टेंबर 2019

केडगाव (पुणे) : राष्ट्रीय समाज पक्ष व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांमध्ये बुधवारी (ता. 25) पाटस (ता. दौंड) येथे "चाय पे चर्चा' चांगलीच रंगली. कट्टर राजकीय विरोधक असलेले चहापान कार्यक्रमात मनमोकळ्या गप्पा मारत असताना पोलिस एका वेगळ्याच कारणामुळे तणावाखाली होते. या चर्चेवर विश्वास बसेना, त्यामुळे पोलिसही चक्रावले होते.

 

केडगाव (पुणे) : राष्ट्रीय समाज पक्ष व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांमध्ये बुधवारी (ता. 25) पाटस (ता. दौंड) येथे "चाय पे चर्चा' चांगलीच रंगली. कट्टर राजकीय विरोधक असलेले चहापान कार्यक्रमात मनमोकळ्या गप्पा मारत असताना पोलिस एका वेगळ्याच कारणामुळे तणावाखाली होते. या चर्चेवर विश्वास बसेना, त्यामुळे पोलिसही चक्रावले होते.

भाजपचे नेते रावसाहेब दानवे हे वरवंड ( दौंड) येथे येणार होते. महिला राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्षा वैशाली नागवडे या वरवंड येथे निदर्शने करणार आहेत, अशी कुणकूण पोलिसांना लागली होती. पोलिसांनी नागवडे यांना फोन केला तेव्हा नागवडे म्हणाल्या, मी व आमदार राहुल कुल चहा पीत आहेत. कट्टर राजकीय विरोधक असलेले दोन पदाधिकारी एकत्रित चहा पीत असल्याचे ऐकून पोलिसांचाही यावर विश्वास बसेना. त्यामुळे पोलिस वारंवार नागवडे यांना फोन करून विचारत होते की "खरं सांगा तुम्ही कुठे आहात?'. निदर्शने झाली नाहीत. मात्र, पोलिसांच्या चौकशीने चर्चेत आणखीच रंग भरला.

भीमा साखर कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेनंतर आमदार कुल व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी यांच्यात कारखान्याच्या विश्रामगृहात "चाय पे चर्चा' चांगलीच रंगली. यावेळी राष्ट्रवादीचे विकास खळदकर, ज्योती झुरंगे, ज्ञानेश्वर शेळके, रामदास दोरगे, कॉंग्रेसचे विठ्ठल दोरगे, तुकाराम ताकवणे, निळकंठ शितोळे उपस्थित होते.
दरम्यान, यावेळी आमदार कुल यांनी पुणे जिल्हा दूध संघाचे माजी अध्यक्ष रामभाऊ टुले यांच्याकडून कात्रजच्या उपपदार्थांची माहिती घेतली. दौंड तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष अप्पासाहेब पवार यांच्या भाषण शैली बाबतही कुल यांनी कौतुक केले. अप्पासाहेब पवार हे राहुल यांना कोपरखळी मारत म्हणाले की, तुमचा आयाराम गयारामचा विषय संपला का ?. त्यावर कुल यांनीही मोठ्या खुबीने उत्तर दिले. विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या असताना या दिल जमाईची तालुक्‍यात चर्चा आहे.

आपण पदाधिकारी एकमेकांशी चांगले संबंध ठेवतो. पण कार्यकर्ते सोशल मीडियावर फार पातळी सोडून टीका करतात. यावरून वाद होतात. हे वाद पदाधिकाऱ्यांना मिटवावे लागतात. आज आपण राजकारण बाजूला ठेवत चहापानासाठी एकत्र आलो, छान गप्पा झाल्या. सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनीही परस्परांमध्ये असे संबंध ठेवावेत.
- राहुल कुल, आमदार, दौंड

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dound Politics Between RSP & NCP