पुण्यातील गुंडांनो, चंबुगबाळे आवरा...तुमचा कर्दनकाळ आलाय...

जनार्दन दांडगे
Friday, 18 September 2020

जिल्ह्यात मटका, जुगार, अवैध दारू विक्री, बेकायदा वाळू उपसा यासारखे अवैध धंदे करणाऱ्यांनो, आपला गाशा गुंडाळा...कारण, अवैधधंदेवाल्यांचे कर्दनकाळ समजले जाणारे डॉ. अभिनव देशमुख हे पुढील एक- दोन दिवसात जिल्हा (ग्रामिण) पोलिस अधिक्षक या नात्याने पदभार सांभाळणार आहेत.

लोणी काळभोर (पुणे) : जिल्ह्यात मटका, जुगार, अवैध दारू विक्री, बेकायदा वाळू उपसा यासारखे अवैध धंदे करणाऱ्यांनो, आपला गाशा गुंडाळा...कारण, अवैधधंदेवाल्यांचे कर्दनकाळ समजले जाणारे डॉ. अभिनव देशमुख हे पुढील एक- दोन दिवसात जिल्हा (ग्रामिण) पोलिस अधिक्षक या नात्याने पदभार सांभाळणार आहेत. यापूर्वीचे पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी देखील जिल्ह्यात यशस्वी कारकीर्द पार पाडली होती. मात्र, संदीप पाटील यांनी स्वतःहून गडचिरोलीसारख्या नक्षली भागात काम करण्यासाठी बदली मागून घेतली. त्यामुळे त्यांच्या जागी आता देशमुख यांची नियुक्ती केली आहे.

अजित पवार पुन्हा कडाडले, 'हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही'

कोल्हापूर जिल्ह्यात मागील दोन वर्षाच्या काळात अधिक्षक असताना, "माझ्या हद्दीत जर कोणी काहीही आगाऊपणा केला, तर त्याचं तंगडे मोडले शिवाय राहणार नाही," असं जाहीरपणे अवैध धंदेवाले व त्यांच्या बगलबच्च्यांना ठणकावले होते. त्यानंतर त्यांनी कोल्हापुरातून मागील दोन वर्षाच्या काळात अवैधधंद्यावाल्यांची वाट लावली होती. कोल्हापूर जिल्हा अधीक्षकपदावर व गडचिरोली पोलिस अधीक्षकपदावर त्यांनी केलेल्या कामाची गृहमंत्रालयाकडून दखल घेतली होती. त्यांना नुकतेच आंतरिक सेवा सुरक्षा पदक देखील प्रदान केले आहे. गुन्हेगारांचा कर्दनकाळ, अशी ओळख असलेल्या देशमुख यांच्या कामाचा दरारा हा पोलिस कर्मचाऱ्यांपासून सर्वच स्तरातील नागरिकांमध्ये आहे. त्यामुळे त्यांच्या कार्यकाळात पुणे ग्रामीण भागातील गुन्हेगारी व अवैधधंद्याना आळा बसेल, अशी आशा नागरिक व्यक्त करत आहेत.

बर्थ डे स्पेशल...अमोल कोल्हे यांच्या गनिमीकाव्यापुढे विरोधक हतबल

देशमुख हे एमबीबीएस आहेत. ते आरामशीरपणे वैद्यकीय व्यवसाय करत बसू शकले असते. पण, त्यात ते रमले नाहीत. त्यांनी युपीएससीची परीक्षा दिली आणि ते असिस्टंट कमिशनर ऑफ कस्टम झाले. आता तर आपण भलं आपली नोकरी भली, असे ते जगू शकले असते. पण, त्यांनी आयपीएसची तयारी सुरू केली आणि त्यात ते यशस्वी झाले. ठाणे, एसआरपी, सातारा व त्यानंतर गडचिरोलीसारख्या नक्षलवादी परिसरात त्यांनी काम केले. कोल्हापूरचा अधिक्षक या नात्याने पदभार स्वीकारताच, "बाते कम काम जादा" या पद्धतीने ते कामास लागले. मी मी म्हणणारे, मला पोलिस काही करू शकत नाहीत, असे म्हणणाऱ्यांना त्यांनी पोलिसी खाक्या दाखवत कॉलरला धरून आत घातले. अनेक जण कोल्हापूर सोडून फरारी झाले. सकाळी लॉकअपमध्ये जायचे आणि दुपारी जामिनावर सुटायचे, अशी सवय असलेले अनेक जण दोन-दोन तीन-तीन वर्षे जेलच्या आत पिसत राहिले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पोलिस खात्यात जो चांगले काम करतो, त्याच्या पाठीवर थाप आणि जो पोलिस दलाची प्रतिमा खराब करतो, त्याला झटका देण्याची पद्धत त्यांनी सुरू केली. फार न बोलता एखादा अधिकारी किती चांगले काम करू शकतो, याचे दर्शन देशमुख यांनी त्यांच्या कोल्हापुरातील कारकिर्दीत घडवले. असे देशमुख आता पुणे जिल्ह्यात येत आहेत.  

पत्नीही डाॅक्टर
अभिनव देशमुख यांच्या पत्नी सोनाली याही डॉक्टर आहेत. विशेष म्हणजे त्या क्रांतिकारी लाड परिवारातील आहे.  आता कोरोनाच्या काळात त्यांनी कोल्हापूरमधील सीपीआर हॉस्पिटलमध्ये रुग्ण सेवा केली आहे. "मी एसपीची बायको" हा भाव त्यांनी कधीच दाखवलेला नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dr. Abhinav Deshmukh is the new Superintendent of Pune District