डॉ. अनिल गुप्ता यांचे आज व्याख्यान

डॉ. अनिल गुप्ता यांचे आज व्याख्यान
Published on: 

पुणे, ता. १० : ‘सकाळ’चे संस्थापक डॉ. नानासाहेब परुळेकर यांच्या १२९ व्या जयंतीनिमित्त नवकल्पनांचे प्रवर्तक डॉ. अनिल के. गुप्ता यांचे विशेष व्याख्यान रविवारी (ता. ११) आयोजित केले आहे. डॉ. गुप्ता हे ‘शोध नवसंकल्पनांचा’ या प्रेरक विचारांवर मांडणी करणार आहेत. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.
शिवाजीनगरमधील मॉडर्न अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या सभागृहात सायंकाळी साडेपाच वाजता व्याख्यान होणार आहे. यावेळी ‘साप्ताहिक सकाळ’च्या ४० व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कथा स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा आणि कथा विशेषांकाचे प्रकाशनही होणार आहे. डॉ. परुळेकर यांनी समाजातील शेवटच्या घटकाचे प्रश्‍न समजून घेत त्याला व्यासपीठ मिळवून देण्याचे ध्येय आयुष्यभर जपले. याच विचाराला कृतीची जोड देणाऱ्या डॉ. गुप्ता यांचे प्रेरक विचार पुणेकरांना यानिमित्ताने ऐकता येणार आहेत. ज्ञान केवळ प्रयोगशाळा किंवा विद्यापीठांपुरते मर्यादित नसून ते गाव, शेत आणि सामान्य माणसाच्या अनुभवातून कसे आकार घेते, हे डॉ. गुप्ता यांनी आपल्या कार्यातून सिद्ध केले आहे.
डॉ. गुप्ता हे व्यवस्थापनतज्ज्ञ, संशोधक, लेखक आणि तळागाळातील नवकल्पनांचे जागतिक प्रवक्ते म्हणून ओळखले जातात. भारतीय व्यवस्थापन संस्था (आयआयएम-अहमदाबाद) येथे तब्बल ३६ वर्षे अध्यापन केलेले डॉ. गुप्ता हे ज्ञानाच्या शोधात भारतभर हजारो किलोमीटरची पदयात्रा करणारे ‘शोधयात्री’ आहेत. त्यांच्या ‘शोधयात्रा’ या आगळ्यावेगळ्या उपक्रमातून त्यांनी शेतकऱ्यांच्या कल्पना आणि ग्रामीण कारागिरांच्या अद्भुत सर्जनशीलतेचा अभ्यास केला. देशातील हजारो शेतकऱ्यांचे, आदिवासी बांधवांचे, विद्यार्थ्यांचे आणि सर्वसामान्यांचे नवनवीन शोध आणि कल्पना जगासमोर आणल्या. भारत सरकारने त्यांना ‘पद्मश्री’ पुरस्कारानेही सन्मानित केले आहे.

कार्यक्रमाबाबत...
कधी? : रविवारी (ता. ११)
कुठे? : प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे सभागृह, मॉडर्न अभियांत्रिकी महाविद्यालय, शिवाजीनगर, पुणे.
केव्हा? : सायंकाळी ५.३० वाजता

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com