महाराष्ट्राची वैभवसंपन्न परंपरा 'वारी' 

wari 3.jpg
wari 3.jpg

Wari 2020 : ज्ञानेश्‍वरांच्या वेळी महाराष्ट्रात स्वराज्य होते; परंतु नंतरच्या अडीचशे वर्षांत मुसलमानी सत्तेच्या चक्रात महाराष्ट्र सापडला होता. हिंदू धर्म व संस्कृतीस दैन्यावस्था प्राप्त झाली होती. एकनाथांच्या काळात या परिस्थितीचा कडवटपणा कमी होऊन धार्मिक पुनरुज्जीवनास वाव मिळाला. एकनाथांनी बिकट परिस्थितीत वारकरी संप्रदायाच्या पुनरुज्जीवनाचे काम केले. संस्कृती संवर्धनाची कामगिरी वारकरी संप्रदायाने केली. शुद्धाचरणास महत्त्व असलेल्या या संप्रदायाने नीतिमत्ता वाढीस लावली. 

तेरावे शतक संतजीवनाचा प्रभाव निर्माण करणारा कालखंड म्हटला पाहिजे. या काळात ज्ञानदेव, नामदेव, चोखामेळा, सावतामाळी, गोरा कुंभार, कान्होपात्रा, जनाबाई यांसारखी विठ्ठलभक्तीत एकरूप झालेली संतमंडळी झाली. ज्ञानदेव - नामदेव काळ यादव राजवटीचा होता. धर्म हा लोकजीवनाचा बिंदू होता. तो लोप पावू नये म्हणून त्याच्या रक्षणाची जबाबदारी आपल्या शिरावर घातली, असे सांगून ज्ञानदेवांनी भागवत धर्ममंदिराचा पाया रचला व भक्तिपंथाला अध्यात्मविद्येचे अधिष्ठान प्राप्त करून दिले. ज्ञानदेवांनी कृष्णभक्तीचा वारसा विठ्ठलभक्तीत परावर्तीत केला. भागवत धर्माच्या विठ्ठलभक्तीस त्यामुळे सामर्थ्य प्राप्त झाले. 

ज्ञानदेवांनी तत्त्वज्ञान आणि प्रेमाचे पाठबळ दिले. ज्ञानदेवांनी भक्कम पाया रचल्यावर नामदेवांनी मंदिराची वास्तू बांधली आणि वाढवली. भक्तीचा झेंडा पंजाबपर्यंत फडकविला. त्यानंतर एकनाथांनी नाथभागवताद्वारे हा फडकत ठेवला. शेवटी तुकोबारायांनी मंदिरावर कळस चढविला. गोरोबा, चोखोबा आदी संतजनांच्या भक्तीने, अभंगरचनेने भक्कमपणा प्राप्त झालेले भागवत धर्ममंदिर सातशे वर्षे अभंग राहिले. भक्तमंडळी भाविकजन याबरोबर जिज्ञासू, अभ्यासक, विदेशवासी हे वारकरी जीवनाचा अनुभव प्रत्यक्ष घेताना दिसून येतात. 

कर्मवादाचे थोतांड नाही 
ज्ञानदेव कर्मवादाचा पुरस्कार करतात. तरी त्यांच्या विचारात कर्मवादाचे थोतांड नाही. स्वर्गसुखाच्या अपेक्षेने यज्ञयाग, व्रतवैकल्ये, तीर्थयात्रा करणाऱ्या कर्मठांच्या आत्मज्ञानविरहित आंधळ्या कर्माचरणाचा काही उपयोग नसल्याचे ज्ञानदेव निक्षून सांगतात. भक्तियोगाचे श्रेष्ठत्व हे ज्ञानदेव - नामदेवांसारख्या संतांनी कीर्तनातून जनमानसावर ठसविले. तत्कालीन समाजजीवनावर त्याचा निश्‍चित परिणाम झाला असावा. कारण त्यानंतर वारकरी आचरण करण्याची परंपरा निर्माण झाली. वारकरी तत्त्वज्ञान अद्वैत अशा महत्त्वपूर्ण तत्त्वज्ञानाचा पाठपुरावा करणारे असून, भक्तीला केंद्रस्थानी ठरवून त्यात मोक्षमार्ग स्पष्टपणे सांगितला आहे; ज्ञानाला डावललेले नाही, ही ज्ञानोत्तर प्रेमलक्षणा भक्ती असून, त्यात क्‍लिष्टपणा नाही किंवा गुंतागुंत नाही. उच्च-नीच भेदाभेद नसलेल्या या संप्रदायाने सामाजिक समतेवर आधारित सोहळ्याची परंपरा घालून दिली. शुद्ध अंतःकरण, नीतिमत्तेची जपणूक हे परमार्थाचे सूत्र असल्याचे या संप्रदायाने सांगितले आहे. समता, बंधुभावाची शिकवण या संप्रदायाने दिली. वारकरी आचार-विचाराने नीतीची पातळी उंचावली जाते. 
आजच्या व्यवहारात दैनंदिन जीवनात अनंत अडचणी व समस्या आहेत.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

हिंसा-अहिंसा, सत-असत्‌, प्रवृत्ती-निवृत्ती, समता-विषमता, द्वैत-अद्वैत यांमधून कसली निवड करावी, कोणता निर्णय घ्यावा याविषयी सतत चिंता वाटणारे वातावरण असते. अशा वेळी दैवी गुणांची अंमलबजावणी करावी किंवा दैवी गुण अंगीकारावेत म्हणून वारकरी संप्रदाय सांगतो. मानवी मूल्यांची आदर्श पातळीवर जोपासनादेखील या संप्रदायाने अतिशय उत्तमरीतीने सांगितलेली आहे. संसार सोडायचा नाही, त्यात बुडायचे नाही, ईशस्मरण नित्याने करावयाचे आणि अनासक्तीने सर्व व्यवहार करावयाचे हे वारकरी संतांनी शिकवले. प्रपंचात राहून परमार्थ करता येतो किंवा वारकरी आचरण करावयाचे, ईश्‍वरभक्ती करावयाची तर त्यासाठी संसारत्याग करावा, संन्यास घ्यावा असे हा संप्रदाय सांगत नसल्याने वारकरी संप्रदायाचे आचरण सर्वांना सहजसुलभ वाटते. वारकरी पंथाने लोकांच्या मनावर नीतीने वागण्याचे उत्कृष्ट संस्कार केले आहेत, तसेच परद्रव्य वर्ज्य ही या पंथातील शिकवण आहे.

 कोरोना झाला आमदारांना...ग्रामस्थांचा जीव टांगणीला
बऱ्याचदा दैनंदिन व्यवहारात संपत्ती मिळवताना दुसऱ्याची संपत्ती गिळंकृत करावी या अविचाराने काही जण पछाडले जातात, तर परस्त्रीविषयी अभिलाषा निर्माण झाल्याने संघर्ष किंवा गुंतागुंत निर्माण होते. म्हणूनच परद्रव्याविषयी अनासक्तीचा विचार मांडणाऱ्या वारकरी संप्रदायाने परस्त्री रुक्‍मिणी मातेसमान असल्याबद्दल स्त्रीविषयी पवित्र व मंगल विचार मांडला आहे. हा विचार कोणत्याही काळात समाजाची सुदृढ पायाभरणी करणारा आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. 

जातीविचाराला वगळले 
जातीव्यवस्था मोडण्याची चळवळ वारकरी संतांनी केली नाही. जातीचा ज्या वर्णगटात समावेश होतो, ती वर्णव्यवस्था समाजस्वास्थ्यास चालत आलेली अशी व्यवस्था आहे हे ओळखून त्यात मुरलेल्या उच्च-नीचभावाचा दोष काढण्याचा प्रयत्न केला. व्यक्तीचे मूल्यमापन भक्तीवरून करण्याची दिव्य दृष्टी दिली. तसे पाहिले तर वारकरी संप्रदायाने ज्या काळात आपल्या कार्याची मुहूर्तमेढ रोवली, तो म्हणजे तेराव्या शतकातील काळ. तत्कालीन परिस्थितीत वर्णव्यवस्थेची परंपरा पूर्णपणे रुजली होती. समाजजीवन हे त्यावर आधारलेली परंपरा जतन करत होती. म्हणून त्यातील जातीभेद, उच्च-नीचता हा विचार "अमंगल' असल्याचे वारकरी संतांनी वारंवार सांगितले. ईश्‍वरभक्तीत जाती-धर्म यांचा अडसर नसतो, तर श्रेष्ठ भक्ती करून श्रेष्ठता मिळवता येते. म्हणूनच अठरापगड जातीमध्ये संत निर्माण होऊन हाच विचार रुजविण्याचा प्रयत्न झाला. तेराव्या शतकापासून निर्माण झालेल्या वारकरी संतांच्या सतराव्या शतकापर्यंतच्या परंपरेतील संतांनी जातिभेदाविरुद्ध विचार ओव्या, अभंग, कीर्तन, प्रवचनातून मांडले. त्यानंतर सांप्रदायिक श्रेष्ठींनी याच विचाराचा पुनरुच्चार केला असल्याचे दिसून येते. आजच्या घडीला जातिभेद, स्पृश्‍यास्पृश्‍य हे कायद्याच्या दृष्टीने अमान्य झाले असले, तरी मना-मनातील दुरावा दूर करण्यासाठी वारकरी संतांचे प्रबोधन आजही उपयुक्त ठरते.


धार्मिक मनोवृत्तीच्या समूहावर बऱ्याचदा अंधश्रद्धेचा आरोप केला जातो. वारकरी संप्रदायातील मंडळी मात्र अंधविश्‍वासाने वागणारी नाहीत. ज्ञानेश्‍वरी, तुकाराम गाथा आणि सकल संतगाथा वाचून वारकरी संप्रदायाविषयी जाणून घेऊन वारकरी आचरण शुद्ध मनाने करणारी जाणकार मंडळी असतात. आपल्या संप्रदायाबद्दल ज्ञान संपादन, चिंतन, मननही करणारी असतात. पंढरपूर वारीला अनेक वर्षांची परंपरा आहे. त्यामुळे वारी हा विचार आहे, वारी हा आचार आहे. गेल्या काही वर्षांमध्ये ग्रामीण भागातील समूहाबरोबर शहरी भागातील सुशिक्षितांचे प्रमाण वारीत सहभागी होण्याच्या इच्छेने वाढत आहे. वारीचा विचार जीवनाचा अविभाज्य भाग बनला असून, मना-मनाची मशागत करणारा वारकरी संप्रदाय आणि जीवन समृद्ध करणारी वारी म्हणजे महाराष्ट्र संस्कृतीचे भूषण आहे. दर वर्षी ज्येष्ठ-आषाढ महिना वारीच्या वातावरणाने प्रफुल्लित होतो. टाळ-मृदंगाच्या गजरात संत तुकारामांची पालखी देहूहून, तर संत ज्ञानेश्‍वर माऊलींची पालखी आळंदीहून पंढरपूरला प्रस्थान करते. आषाढी एकादशीला पंढरपूरला आठ-दहा लाख वारकऱ्यांचा समुदाय पोचतो. 
पंढरपूरवारी आणि वारकरी संप्रदाय म्हणजे श्रीविठ्ठलभक्तीची गुंफण केलेला भक्तजनांचा मेळा असून, वारीची श्रेष्ठता ज्ञानदेव काळापासून सातशे वर्षांपूर्वीपासून आजच्या काळातदेखील कायमची जनमानसावर ठसली आहे. वारी म्हणजे आनंदानुभव! 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com