पुण्यातील 'हा' भाग झाला कोरोनामुक्त

बाबा तारे
बुधवार, 8 जुलै 2020

 औंध क्षेत्रीय कार्यालयाचा दावा ; 23 जूननंतर एकही रुग्ण नाही

औंध (पुणे) : डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसाहतीत 6 जून रोजी पहिला रुग्ण आढळला होता. दरम्यान, 23 जून नंतर येथे एकही रुग्ण आढळलेला नाही. नियमित औषध फवारणी, स्क्रिनिंग, जागृती या उपाययोजनांमुळे येथील कोरोनाचा फैलाव रोखण्यात प्रशासनाला यश आले आहे. 
औंध येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर वसाहतीत पहिला रुग्ण आढळल्यानंतर येथील संख्या झपाट्याने वाढणार अशी शक्‍यता वर्तविण्यात येत होती. येथील लोकसंख्या अडीच ते तीन हजारच्या घरात आहे. 6 जून ते 23 जून दरम्यान येथे फक्त सहा रुग्ण आढळले आहेत.

तरुणांनो, 'या' १० क्षेत्रांत लाॅकडाऊनमध्येही मिळतेय नोकरीची संधी!​

23 जूननंतर एकही रुग्ण या भागात आढळला नसल्यामुळे महापालिकेकडून जाहीर करण्यात आलेले सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्रही हटवण्यात आले आहे. तसेच, वसाहतीने कोरोनावर यशस्वी मात केल्याचा दावा औंध क्षेत्रीय कार्यालयाच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आला आला आहे. येथे साडे सहाशे घरांना वापरासाठी एकच सार्वजनिक स्वच्छतागृह आहे. यातूनही कोरोनाचा प्रसार होण्याची दाट शक्‍यता होती. परंतु, रहिवाशांनी सॅनिटाइजर व मास्कचा वापर करुन व सुरक्षित अंतर राखत कोरोनाला रोखले. 

खासदार डॉ. अमोल कोल्हे झाले होम क्वारंटाईन, कारण...​

चतु:श्रृंगी पोलिस, आरोग्य विभागाचे वरिष्ठ निरीक्षक विजय भोईर, निरीक्षक राजेंद्र वैराट यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्या सकारात्मक भूमिकेने परिसर कोरोनामुक्त झाल्याचे नागरिकांनी सांगितले. 

 

कोरोना हद्दपार करण्यात तेथील जनता व पोलिस यंत्रणेने महत्त्वाची भूमिका बजावली. तसेच, प्रशासकीय यंत्रणेनेही योग्य काम केले. रस्ते वेळीच बंद केल्याने संक्रमण रोखले गेले. सहा रुग्णानंतर तीन वेळा सर्वेक्षण केल्यावर एकही रुग्ण सापडला नाही. परंतु भविष्यातील धोका संपलेला नसून संक्रमणाची टांगती तलवार असल्याने प्रशासनाला अजून लढा देण्यासाठी सज्ज रहावे लागणार आहे. 
- जयदीप पवार, सहाय्यक आयुक्त, औंध क्षेत्रीय कार्यालय 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dr. Babasaheb Ambedkar colony became free from corona