डॉ. आंबेडकर साहित्याच्या खंडांची प्रतीक्षा संपेना 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 एप्रिल 2018

डॉ. आंबेडकर साहित्याचे प्रदर्शन 
कधी - ता. 13 व 14 एप्रिल 
कुठे - शासकीय फोटोझिंको मुद्रणालय 
वेळ - सकाळी सात ते रात्री दहा 
विशेषत्वाने डॉ. आंबेडकर साहित्यविषयक ग्रंथ व खंडावर दहा टक्के सवलत 

पुणे - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र साहित्यापैकी "बहिष्कृत भारत आणि मूकनायक', खंड 17 (भाग तीन) आणि खंड सातच्या प्रती गेल्या दीड-पावणेदोन वर्षांपासून शासकीय फोटोझिंको मुद्रणालयात उपलब्ध नाहीत. परिणामी, इच्छा असूनही खंड खरेदी करता येत नसल्याची खंत वाचक व्यक्त करत आहेत. 

भारतीय संविधानासह डॉ. आंबेडकर यांचे खंड, महात्मा फुले समग्र वाङ्‌मय, महाराजा सयाजीराव गायकवाड खंड, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे समग्र वाङ्‌मय खंड, छत्रपती राजाराम महाराज यांचे निवडक आदेश यासारखे विविध ग्रंथ आणि खंड मुद्रणालयाकडून प्रकाशित होतात; मात्र सध्या डॉ. आंबेडकर यांच्या 22 खंडांपैकी काही खंड उपलब्ध नाहीत. मुद्रणालयातील अपुरा कर्मचारी वर्ग, तांत्रिक अडचणी यासारखी कारणे या संदर्भात देण्यात येत आहेत; परंतु गेल्या दीड-दोन वर्षांत वरील खंड उपलब्ध का होऊ शकले नाहीत, त्यांच्या प्रती का छापण्यात आल्या नाहीत, याचे ठोस उत्तर मात्र शासकीय अधिकाऱ्यांकडे नाही. डॉ. आंबेडकर साहित्याला समाजातून विशेषत्वाने मागणी असते; पण तरीही शासनदरबारी त्याची योग्य ती दखल घेतली जात नसल्याचेच वस्तुस्थितीवरून जाणवते. 

मुद्रणालयात 554 कर्मचाऱ्यांची आवश्‍यकता आहे; मात्र सध्या जवळपास चारशे कर्मचारी आहेत. त्यामुळे आहे त्या कर्मचाऱ्यांमध्ये काम करावे लागत आहे. त्यातच राजपत्रांची छपाई, पुस्तकांचा दर्जा, बांधणी व तत्सम अन्य शासकीय कामांसाठी वेळ द्यावा लागतो. त्यातूनही मागणीप्रमाणे खंडांच्या छपाईचे काम करावे लागते, असे अधिकारी सांगतात. 

बहिष्कृत भारत आणि मूकनायक, खंड 17 व 7 आदी खंडांना वाचकांकडून अधिक मागणी आहे. या महिनाअखेरपर्यंत किमान एक हजार प्रती छापण्यास आमचे प्राधान्य राहील. 
- राजेंद्र पोळ, प्रभारी व्यवस्थापक 

जयंतीदिनी महामानवाच्या विचारांचा आनंदोत्सव साजरा व्हावा, ही फुले-शाहू-आंबेडकर चळवळीतल्या कार्यकर्त्यांची माफक अपेक्षा असते; परंतु डॉ. आंबेडकर यांच्या एकूण खंडांपैकी काही खंड उपलब्ध नाहीत, याचा अर्थ शासन उदासीन आहे. 
- दीपक म्हस्के, सचिव, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती 

उपलब्ध ग्रंथ 
डॉ. आंबेडकर खंड एक (इंग्रजी), दोन (इंग्रजी), तीन (इंग्रजी), खंड पाच (इंग्रजी), खंड नऊ (इंग्रजी), खंड 12 (इंग्रजी), खंड 14 (इंग्रजी), खंड 15 (इंग्रजी), खंड 16 (इंग्रजी), खंड 17 (भाग दोन-इंग्रजी), खंड 18 (भाग एक-मराठी, भाग दोन मराठी, भाग तीन तीन मराठी), खंड 19 (मराठी), खंड 20 (मराठी), खंड 22(मराठी), डॉ. आंबेडकर जातिव्यवस्थेचे निर्मूलन (इंग्रजी), डॉ. आंबेडकर गौरवग्रंथ आणि भारताचे संविधान (मराठी व इंग्रजी भाषेत) आदी. 

डॉ. आंबेडकर साहित्याचे प्रदर्शन 
कधी - ता. 13 व 14 एप्रिल 
कुठे - शासकीय फोटोझिंको मुद्रणालय 
वेळ - सकाळी सात ते रात्री दहा 
विशेषत्वाने डॉ. आंबेडकर साहित्यविषयक ग्रंथ व खंडावर दहा टक्के सवलत 

Web Title: Dr. Babasaheb Ambedkar literature