स्फूर्तिस्थान

स्फूर्तिस्थान

पिंपरी - आंदोलने असो निदर्शने, सभा असो वा संमेलने, मोर्चा असो वा जनजागृती फेरी, ईदचा जुलूस असो वा साहित्य संमेलनाची ग्रंथदिंडी, अन्यायाविरुद्ध लढा उभारणे असो वा ज्ञानक्रांतीची मशाल पेटवणे या सर्वांचा प्रारंभ पिंपरी चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासमोर नतमस्तक होऊनच केला जात आहे. बाबासाहेबांचा हा पुतळा म्हणजे शहरातील सर्वांचे स्फूर्तिस्थान झाले आहे.

पुणे-मुंबई महामार्गालगत पिंपरी रेल्वे स्टेशन- भोसरी रस्त्यावरील चौकालगत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा महापालिकेने उभारला आहे. चौकाचे नामकरणच ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक’ असे केलेले आहे. पुतळ्याच्या परिसराला बागेचे स्वरूप दिलेले असून, कारंजे व विद्युत रोषणाई आकर्षित करते. हे एक स्मारक बनलेले आहे. तिथे नतमस्तक होऊनच अनेक सभा, संमेलने, आंदोलने झालेली आहेत. होत आहेत. या पुढेही होत राहतील.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे न्यायासाठी लढले. त्यामुळे त्यांच्या पुतळ्यासमोर नतमस्तक झाल्यानंतर न्यायासाठी लढण्याची प्रेरणा मिळते, अशी आमची भावना आहे. उपेक्षित, वंचितांच्या न्यायहक्कासाठी लढा उभारला आहे. पुतळ्यामुळे कार्यकर्त्यांना नैतिक पाठबळ मिळते. प्रामाणिक कार्यकर्त्याला नेहमी वाटत असते, की डॉ. बाबासाहेब यांच्यासमोर उभे राहूनच आपण बोलतोय. त्यांच्या विचारांचे अनुकरण आपण केले पाहिजे. हा विचार कार्यकर्त्यांच्या मनात येणे, हा बाबासाहेबांच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव आहे. येथे केलेले आंदोलन हे आंदोलन नसते तर, तो एक विचार असतो. त्यामुळे सच्चा कार्यकर्ता प्रवाही होतो. 
मानव कांबळे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते

शहरामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा असावा, अशी परिवर्तनवादी चळवळीतील कार्यकर्त्यांनी नगरपालिकेकडे मागणी केली होती. त्यानुसार अर्धपुतळा बसविण्याचा निर्णय नगरपालिकेने घेतला. मात्र, काही वर्षांनी पूर्णाकृती पुतळा उभारण्याची मागणी कार्यकर्त्यांनी केली. त्यानुसार पूर्णाकृती पुतळा उभारला होता. पुणे-मुंबई महामार्गाच्या रुंदीकरणामुळे पुतळा स्थलांतरित करण्यात आला. सध्याचा पुतळा असलेले ठिकाण हे शहराचे मध्यवर्ती ठिकाण आहे. महापालिकेपासून जवळ आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समता, न्याय व बंधुता यासाठी लढा उभारला होता. हाच वारसा आजही जपला जात आहे. अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आणि त्यांचा पुतळा देत आहे.  
श्रीकांत चौगुले, ज्येष्ठ साहित्यिक व अभ्यासक

प्रारंभीचा अर्धपुतळा
परिवर्तन चळवळीतील कार्यकर्त्यांच्या मागणीनुसार पुतळा उभारण्याचा नगरपालिकेचा निर्णय 
अर्धपुतळा उभारणी व अनावरण १४ एप्रिल १९८१
 पुतळा समिती अध्यक्ष मामासाहेब पिंपळे, 
 नगराध्यक्ष डॉ. श्री. श्री. घारे

पूर्णाकृती पुतळा
कार्यकर्त्यांच्या मागणीनुसार अर्धपुतळ्याऐवजी पूर्णाकृती पुतळा उभारण्याचे निश्‍चित
पूर्णाकृती पुतळा अनावरण : २५ फेब्रुवारी १९९४
हस्ते : शरद पवार
महापौर विलास लांडे
पुतळा समिती अध्यक्ष पी. व्ही. मसुरे

पुतळा स्थलांतर आणि सुशोभीकरण
महामार्गाचे रुंदीकरण झाल्याने पुतळा स्थलांतर व सुशोभीकरणाचा निर्णय : २०००
सध्याचा पूर्णाकृती पुतळा व सुशोभीकरण अनावरण : १२ एप्रिल २००२
हस्ते : रामदास आठवले
महापौर : प्रकाश रेवाळे

पूर्णाकृती पुतळ्याची वैशिष्ट्ये
बुद्ध विहारासारखा घुमट
बुद्ध लेणीप्रमाणे खिडक्‍या
 दोन्ही बाजूस सुंदर कारंजे
शोभेची व फुलझाडांची लागवड
कारंजे व दिव्यांची रोषणाई
परिसरात हिरवळ व बोधिवृक्ष

भीमसृष्टीचे काम प्रगतिपथावर
डॉ. बाबासाहेबांचे चरित्र म्युरल्सच्या माध्यमातून मांडणार
‘ब्राँझ’पासून तयार केलेली १९ म्युरल्स असतील
म्युरल्स तयार करण्याचे काम सुरू
म्युरल्स बसविण्यासाठी भिंत उभारण्याचे काम प्रगतिपथावर
 मार्च २०१८ अखेर भीमसृष्टीचे काम पूर्ण करण्याचे उद्दीष्ट 

--

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com