साधनेतून घडतो ऋषितुल्य कलाकार - डॉ. श्री बालाजी तांबे

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 जानेवारी 2017

पुणे - ‘‘कला सर्व संस्कृतींसाठी असते. ही संस्कृतीच समाजाला बांधून ठेवते. कलाकाराच्या कलेतूनही स्वतंत्र अभिव्यक्ती उमटते, कारण कला ही साधना आहे. या साधनेचा उपयोग कलेच्या वृद्धीसाठी केला, तर कलाकारही ऋषितुल्य होतो,’’ असे मत आयुर्वेदाचार्य डॉ. श्री बालाजी तांबे यांनी व्यक्त केले.  

संस्कार भारती आयोजित ‘तृतीय कलासाधक संगम’च्या उद्‌घाटनप्रसंगी ते बोलत होते. या वेळी दिल्ली येथील इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्राचे डॉ. सच्चिदानंद जोशी, योगेंद्रजी, अखिल भारतीय संघटनमंत्री गणेश रोडे, स्वागताध्यक्ष भारत देसडला, प्रांताध्यक्ष उस्ताद उस्मान खाँ, प्रांत महामंत्री सतीश कुलकर्णी, कार्याध्यक्ष श्‍याम जोशी, विजय कोपरकर, सारंग कुलकर्णी उपस्थित होते. ‘कलादर्पण’ या स्मरणिकेचे या वेळी प्रकाशन झाले. 

आयुर्वेदाचार्य डॉ. श्री बालाजी तांबे म्हणाले, ‘‘संस्कृती माणसांना एकमेकांच्या जवळ आणते. भारतीय संस्कृती ही विविध कलांनी तयार झाली आहे. कलेतून कलाकाराचे मन बोलत असते म्हणूनच कलेची साधना व्हायला पाहिजे. साधनेतही ‘धन’ हा शब्द आहे. साधनेने सधन होता येते; पण कलाकाराने धनाचा उपयोग कलेच्या वाढीसाठी करावा. कलेच्या साधनेकरिता ध्यानधारणा करून स्वतःचे आरोग्य जपावे.’’ 

जोशी म्हणाले, ‘‘आई-वडील, मित्र-मैत्रिणी, निसर्ग अशा अनेक गोष्टींतून संस्कार घडत असतात. संस्कार ही देणगी फक्त भारतीयांनाच लाभली आहे. कला प्रत्येक व्यक्तीकडे असते. मात्र कलेला पारखण्याची, शोधण्याची दृष्टी आपल्याकडे असायला हवी. कलेच्या सादरीकरणातून समाजाला जगण्याची जाणीव करून देण्याची जबाबदारी कलाकारांची आहे.’’ विनया देसाई, रवींद्र खरे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. 

Web Title: dr. balaji tambe speech