'आंदोलनजिवी' हा शब्द म्हणजे हुतात्म्यांना दिलेली शिवी!

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 10 February 2021

देशातील शेतकऱयांच्या बाजूने उभे राहण्याऐवजी केंद्र सरकार शेतकरी
आंदोलनात अडथळे आणण्यासाठीच सातत्याने प्रयत्न करताना दिसते आहे.

पुणे : केंद्र सरकारने केलेल्या कृषी कायद्यांना विरोध करण्यासाठी शेतकऱयांनी सुरू केलेल्या आंदोलनात सहभागी झालेल्या शेतकऱयांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वापरलेला आंदोलनजिवी हा शब्द आक्षेपार्ह आहे. भारताची निमिर्ती आंदोलनाच्या माध्यमातून झालेली आहे. शिवाय संयुक्त महाराष्ट्रासाठीच्या लढ्यामुळेच महाराष्ट्राची निर्मिती झाली आहे. त्यामुळे मोदी यांचा हा शब्द देशाच्या निमिर्ती प्रक्रियेचा व संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील १०५ हुतात्म्यांचा अवमान करणारा आहे. हा शब्द म्हणजे सर्व हुतात्म्यांसाठी शिवीच असल्याचे मत राष्ट्र सेवा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष व भाषातज्ज्ञ डॉ. गणेश देवी यांनी बुधवारी (ता.१०) पुण्यात पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.

अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात तेथील
नागरिकांनी आंदोलन केले होते. त्यावेळी ट्र्म्प यांनी आंदोलकांबाबत
कसलाही वाईट शब्दप्रयोग केला नाही. भारताचे पंतप्रधान मात्र भर संसदेत
शेतकरी आंदोलकांबाबत वाईट शब्दाचा वापर करत आहेत. या कृतीतून ते
ट्रम्पपेक्षाही श्रेष्ठ असल्याचे दाखवून देण्याचा प्रयत्न मोदी यांनी
केला असल्याचा आरोपही डॉ, देवी यांनी यावेळी केला.

झेरॉक्सचे पैसे दिले नाही म्हणून अ‍ॅड. असीम सरोदेंनी EDला पाठवली नोटीस!​

डॉ. देवी म्हणाले, ''भारत हा पूर्वी अन्नधान्याच्या बाबतीत असुरक्षित
होता. त्यामुळे रशियात घोड्यांसाठी असलेले ईल्लू-मिल्लूसारखे अन्नधान्य
खाण्याची वेळ भारतीयांवर आली होती. तेव्हा शेतकऱ्यांनी मेहनत घेऊन आणि पुरेशी सिंचनाची सोय नसतानाही देशाला अन्नधान्याच्या बाबतीत सुरक्षित केले. केवळ शेतकऱ्यांमुळेच आपण अन्नधान्यात सुरक्षित झालो आहोत, हे विसरता कामा नये. शेतकरी आणि असंघटित कामगार या दोन घटकांची काळजी सरकारने घेतली पाहिजे. सरकारने कष्टमय जीवन जगणाऱ्या लोकांचा म्हणजे शेतकऱयांचा प्रश्न सहानुभूतीने सोडवणे गरजेचे होते.''

पोलिस अॅक्शन मोडमध्ये; गावठी कट्टा विकणाऱ्यांना भरला दम​

‘राष्ट्रपतींना दहा लाख सह्या पाठवणार'
देशातील शेतकऱयांच्या बाजूने उभे राहण्याऐवजी केंद्र सरकार शेतकरी
आंदोलनात अडथळे आणण्यासाठीच सातत्याने प्रयत्न करताना दिसते आहे. परंतु या सर्व अडथळ्यांवर मात करत गेल्या मागील तीन महिन्यांपासून पंजाबचे शेतकरी सलग आंदोलन करत आहेत. त्यामुळे खरं तर, पंजाबच्या शेतकऱयांना सॅल्युट केला पाहिजे.

सीता, रावणाच्या देशातील पेट्रोल-डिझेलचे दर रामाच्या भारतापेक्षा कमी कसे?, मोदी सरकारनं दिलं हे उत्तर

या आंदोलनाचा राष्ट्र सेवा दलाचा पाठिंबा आहे. याला पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन राज्यांमधील शेतकऱयांच्या दहा लाख सह्या जमा करण्यात येणार आहेत. या सह्या प्रत्येक तालुक्याच्या तहसीलदारांकडे जमा करून, त्या राष्ट्रपतींना पाठविण्याची मागणी या दोन्ही राज्य सरकारकडे केली जाणार असल्याचे राष्ट्र सेवा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. गणेश देवी यांनी सांगितले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dr Ganesh Devi criticized PM Narendra Modi over farmers agitation