मानवतावादाचे दुसरे नाव मार्क्‍सवादच - कोत्तापल्ले

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 20 डिसेंबर 2016

पुणे - 'मार्क्‍सवादी कवी, दलित कवी असे वेगवेगळे शिक्के कविवर्य नारायण सुर्वे यांच्यावर मारले गेले; पण ते खऱ्या अर्थाने मानवतावादी कवी होते. मानवतावादाचे दुसरे नाव मार्क्‍सवादच आहे, हे त्यांच्या कविता वाचताना आपल्या लक्षात येते. मार्क्‍सवाद हा माणसाला, त्याच्यावरील शोषणाला समजून घेणे आणि त्यातून त्याची मुक्ती करण्याचा व्यापक प्रयत्न आहे'', असे मत माजी संमेलनाध्यक्ष डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांनी सोमवारी व्यक्त केले.

महाराष्ट्र साहित्य परिषद, आशय सांस्कृतिक आणि "अक्षरधारा'च्या वतीने आयोजित कार्यक्रमात डॉ. कोत्तापल्ले यांच्या मनोगतातून आणि सुर्वे यांच्यावरील ध्वनिचित्रफितीतून सुर्वे मास्तरांच्या अनेक आठवणी उलगडत गेल्या. परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, "आशय'चे वीरेंद्र चित्राव, सतीश जकातदार, "अक्षरधारा'च्या रसिका राठिवडेकर उपस्थित होत्या.
डॉ. कोत्तापल्ले म्हणाले, ""सुर्वे हे कुठल्याही जातीच्या बंधनात अडकले नाहीत. काही मोजक्‍या लेखक, कवींच्या साहित्याला घामाचा वास येतो. तो वास सुर्वे यांच्या साहित्यातून आपल्याला अनुभवायला मिळतो. मराठी साहित्याच्या अभिरुचीचा पोत बदलण्याचे काम त्यांनी केले. शोषित, वंचित, कामगार, दलित, स्त्रिया यांची वेदना त्यांनी मांडली. माणसातल्या माणुसकीला ते साद घालतात. त्यामुळे त्यांची कविता काळजाला भिडते. ही कविता अनेक अंगांनी समजून घेतली पाहिजे.''

आपण बऱ्याचदा इतके आत्मकेंद्री असतो की नागपूर, चंद्रपूर या भागात कोण लिहीत आहे, हेही आपल्याला माहीत नसते. अशी स्थिती असेल तर ती फार मोठी थट्टा आहे.
- डॉ. नागनाथ कोत्तापल्ले (माजी संमेलनाध्यक्ष)

Web Title: dr. nagnath kottapalle speech