मानवतेसाठी मिथकांचा विचार मांडावा ­- कोत्तापल्ले

Nagnath-Kottapalle
Nagnath-Kottapalle

पुणे - ‘प्राचीन संस्कृती आकाराला येताना मानवी बुद्धिमत्तेला न पेलणाऱ्या प्रश्नांचा शोध घेण्यासाठी मिथकांचा आधार घेतला गेला. प्रचलित व्यवस्थेच्या समर्थनासाठीही मिथके जोपासली गेली, त्यामुळे लेखकांनी मानवतेसाठी मिथकांचा विचार मांडावा,’’ असे आवाहन ज्येष्ठ साहित्यिक डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांनी गुरुवारी (ता. १४) केले. 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा मराठी विभाग, सेंटर फॉर सोशल सायन्स ॲण्ड ह्युमॅनिटीज व पुण्याच्या संस्कृती प्रकाशनातर्फे आयोजित ‘मराठी साहित्यातील मिथकसृष्टी’ या विषयावरील राष्ट्रीय चर्चासत्राचे उद्‌घाटन कोत्तापल्ले यांच्या हस्ते झाले. अध्यक्षपदी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर होते. लोकसाहित्य व संस्कृतीच्या ज्येष्ठ अभ्यासक डॉ. तारा भवाळकर यांचे बीजभाषण झाले. व्यवस्थापन परिषद सदस्य राजेश पांडे, विभागप्रमुख डॉ. तुकाराम रोंगटे व डॉ. अंजली कुरणे उपस्थित होते.

डॉ. भवाळकर म्हणाल्या, ‘‘प्रकृती व स्वतःमधील नाते शोधण्याच्या प्रयत्नांमधून मिथके जन्माला आली. अभिजन कलांमध्ये साचलेपणा येतो तेव्हा एखादा कलावंत काळाच्या पुढे जाणारे संदर्भ अभिव्यक्त करतो.’’डॉ. विद्यागौरी टिळक यांनी प्रास्ताविक केले. ‘मिथक ः संकल्पना व स्वरूप’ या सत्रात नाटककार डॉ. राजीव नाईक यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. राजश्री देशपांडे व संजय मेस्त्री यांनी विचार मांडले. ‘मराठी कादंबरी आणि मिथकसृष्टी’ या सत्रात डॉ. हरिश्‍चंद्र थोरात यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. हर्ष जगझाप, डॉ. भास्कर शेजवळ, डॉ. प्रभाकर देसाई, डॉ. कल्याणी शेजवळ व डॉ. उमेश शिरसाट हे सहभागी झाले. ‘मराठी कथाविश्व व मिथके’ या सत्रात डॉ. विश्वनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. दिनेश वाघुंबरे, डॉ. संजय शिंदे यांनी मत व्यक्त केले.

लावणीतून अवतरला ‘पंचकल्याणी घोडा’ 
लावणीतील मिथकाचे उदाहरण रेश्‍मा परितेकर यांनी तालाच्या सादरीकरणातून उलगडले. पठ्ठे बापूरावांची ‘पंचकल्याणी घोडा’ ही लावणी त्यांनी देहबोली, पदन्यास व घुंगरांचा नाद कमी-जास्त करत खुलवली. काव्य, गायन, वादन व नृत्यातून घोड्याचे मिथक वापरून घडलेल्या कलाविष्काराचा प्रत्यय आला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com