Dr. Sadanand More : डॉ. सदानंद मोरे यांनी दिला साहित्य महामंडळाचा राजीनामा

मंडळाच्या कामात नोकरशाहीचा हस्तक्षेप दिवसेंदिवस वाढत आहे. याविरोधात मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी राजीनामा दिल्याचेही समजते.
dr sadanand more
dr sadanand moresakal

पुणे - महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाची स्वायत्तता संपवण्याचा प्रयत्न मराठी भाषा विभागातील काही अधिकाऱ्यांकडून केला जात आहे. त्यासाठी मंडळाचे नाव बदलण्याचा घाट घातला जात असून, मंडळाच्या कामात नोकरशाहीचा हस्तक्षेप दिवसेंदिवस वाढत आहे. याविरोधात मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी राजीनामा दिल्याचेही समजते.

‘मंडळ’ हे नामाभिधान बदलून त्याचे ‘साहित्य संचालनालय’ असे नामकरण करण्याचा मानस असल्याचे समजते. मंडळाचे रूपांतर सरकारी खात्यात करण्याचा प्रयत्न केला जात आहे. याशिवाय मंडळाची संरचना बदलण्याचे, उद्दिष्टे बदलण्याचे प्रयत्न काही अधिकारी करत असल्याची चर्चा आहे.

काही दिवसांपूर्वी मंडळाच्या अध्यक्षांसह सदस्यांची याबाबत बैठक झाली होती. या बैठकीत अधिकाऱ्यांच्या हस्तक्षेपाबाबत चर्चा झाली. साहित्य आणि संस्कृती मंडळ हे आर्थिकदृष्ट्या स्वायत्त नसले तरी अन्य बाबतीत स्वायत्त आहे. मात्र या हस्तक्षेपामुळे तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी आणि यशवंतराव चव्हाण यांनी घालून दिलेली मंडळाची परंपरा धोक्यात येत आहे, अशी भूमिका सदस्यांनी मांडली.

त्यामुळे मंडळाची स्वायत्तता संपवण्याच्या या प्रयत्नांविरोधातील ठराव बैठकीत करण्यात आला. हा ठराव राज्याचे मराठी भाषामंत्री दीपक केसरकर यांच्याकडे पाठवण्यात आला आहे.

यापूर्वीही दिला होता राजीनामा

मराठी भाषा विभागातील अंतर्गत राजकारण आणि अधिकाऱ्यांकडून होणाऱ्या अडवणुकीमुळे या वर्षी जानेवारी महिन्यात साहित्य व संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे आणि विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष डॉ. राजा दीक्षित यांनी राजीनामा दिला होता. मात्र मंत्री केसरकर यांनी त्यांची भेट घेत प्रशासकीय हस्तक्षेप दूर करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर त्यांनी राजीनामा मागे घेतला.

विश्वकोश मंडळाच्या कामातही हस्तक्षेप

महाराष्ट्र राज्य विश्वकोश निर्मिती मंडळातही अशा प्रकारचा हस्तक्षेप होत असून, त्याचीही स्वायत्तता संपवण्याचे प्रयत्न केले जात असल्याची चर्चा आहे. अधिकारी नियमांवर बोट ठेवून मंडळाच्या कामकाजात अध्यक्षांना डावलण्याचा प्रयत्न करत आहेत.

मात्र कायद्याने अधिकाऱ्यांना अधिकार दिले असले तरी नैतिकतेचे भान ठेवले पाहिजे, अशी मंडळाच्या सदस्यांची अपेक्षा आहे. मात्र मंडळाचे अध्यक्ष डॉ. राजा दीक्षित किंवा अन्य कोणत्याही सदस्याने अद्याप राजीनामा दिलेला नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com