Pune News : कोट्यावधी रुपये खर्च केले, पण पुणेकर पाण्यातच

पावसाळी गटारात पाण्याऐवजी कचरा व पाणी जाऊन बसत आहे, सोसायट्या, बंगल्यांमध्ये पाणी घुसत आहे.
Drainage block
Drainage blocksakal

पुणे - ‘आम्ही धोकादायक ठिकाणांची यादी तयार केली आहे, पावसाळी गटारांची स्वच्छता झाली आहे, पाणी तुंबलेच तर त्याचा निचरा होण्यासाठी यंत्रणा तैनात आहे’, असा दावा महापालिका प्रशासनाकडून केला जातो. मात्र, प्रत्यक्षात शहरात अवघा अर्धा एक तास जरी मुसळधार पाऊस पडला की लगेच रस्ते पाण्याखाली जाऊन वाहतूक ठप्प होत आहे.

पावसाळी गटारात पाण्याऐवजी कचरा व पाणी जाऊन बसत आहे, सोसायट्या, बंगल्यांमध्ये पाणी घुसत आहे. महापालिका पावसाळी गटार आणि नाले स्वच्छतेसाठी वर्षाला सुमारे २५ कोटी रुपये खर्च केले आहेत. पण मुसळधार पावसाला सुरवात होतच पुणेकरांच्या काळजाचा ठोका चुकत आहे.

पुणे शहरात गेल्या आठवड्याभरापासून मुसळधार पाऊस बरसत आहे. आॅगस्ट महिना कोरडा गेल्याने पाऊस पडल्याचे समाधान आहे. पण पाऊस पडल्यानंतर मदत कार्य करण्यासाठी महापालिकेची यंत्रणा कागदावरच अस्तित्वात असल्याने त्याचा फटका पुणेकरांना बसत आहे.

पावसाळ्यापूर्वी महापालिकेने सांडपाणी व्यवस्थापन विभागाकडून प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयनिहाय पावसाळी गटार, चेंबर आणि नाले सफाईची निविदा काढली. हे काम १०० टक्के पूर्ण झाल्याचा दावा करताच, पावसाळ्यात वेळोवेळी पावसाळी गटारांची, धोकादायक ठिकाणी स्वच्छता केली जाईल त्यामुळे पाणी तुंबणार नाही असा दावा केला होता.

मात्र, एकदा स्वच्छता केल्यानंतर पुन्हा ठेकेदाराने पावसाळी गटार, चेंबरची झाकणे याकडे ढुंकूनही पाहिलेले नाही. जुलै महिन्यात पाऊस झाल्यानंतर बहुतांश चेंबरच्या झाकणांवर कचरा, माती अडकलेली होती, पण ती काढण्यात आलेली नाही. त्यामुळे प्रमुख रस्त्यांसह इतर रस्त्यांवर पाणी तुंबत आहे.

काटकोनात वळवली पावसाळी गटार

दोन दिवसांपूर्वी कोथरूडमधील समर्थ पथ भागात प्रथमच पावसाचे पाणी तुंबले. यावेळी महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी जाऊन पाहणी केली त्यावेळी त्यांना तेथे पावसाळी गटार काटकोनात वळवली असल्याचे दिसून, आले. तसेच पावसाळी गटार व सांडपाणी वाहिन्या एकत्र खासगी जागेत टाकल्याचे दिसून आले. अशा पद्धतीच्या कामामुळे नागरिकांना फटका बसत आहे.

रस्त्यावर पाणी तुंबण्याची कारणे

- रस्त्यावरील कचरा, माती, दगड व्यवस्थित न उचलणे

- कचऱ्यासह माती वाहून आल्याने पावसाळी गटारासह, चेंबर तुंबणे

- सर्वत्र डांबर व सिमेंट काँक्रिट टाकल्याने पाणी जमिनीत मुरत नाही

- नाल्यांमध्ये अतिक्रमण केल्याने रुंदी कमी होणे

- पावसाळी गटारांची क्षमता कमी असणे

- रस्ते समपातळी नसणे, चेंबर उंचावर असल्याने पाणी वाहून जात नाही

पाणी तुंबण्याच्या घटना जास्त होणारा भाग

- कोथरूड डेपो

- धायरी

- सिंहगड रस्ता

- भुयारी मार्ग, आंबेगाव

- खराडी

- विमाननगर

- लोहगाव

- कात्रज कोंढवा रस्ता

- राजस सोसायटी चौक

- स्वामी विवेकानंद चौक, सातारा रस्ता

- महेश सोसायटी चौक, बिबवेवाडी

- रोहन कृत्तिका सोसायटी, सिंहगड रस्ता

‘पावसामुळे शहरात पाणी तुंबल्याचा प्रकार घडल्यानंतर सर्वच क्षेत्रीय कार्यालयांना त्यांच्या भागातील नाले व पावसाळी गटारांची स्वच्छता करण्यास सांगितले आहे. त्याच प्रमाणे आपत्ती व्यवस्थापन विभागाची यंत्रणाही सतर्क आहे.’

- डॉ. कुणाल खेमनार, अतिरिक्त आयुक्त, महापालिका

‘थोडावेळ जरी जोरात पाऊस पडला की रस्त्यावर पाणी साचत आहे. त्यामुळे खड्डेही वाढत आहेत. पावसाळी गटारांची स्वच्छता करण्याची कामे करून घेण्यासाठी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना वेळ नाही असेच दिसून वाटत आहे. पण याचा मनस्ताप नागरिकांना भोगावा लागतो.’

- संतोष धुमाळ, कात्रज

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com