पुणेकर, जरा जपून...

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 जून 2018

पुणे - सांडपाणी वाहिन्या आणि पावसाळी गटारांच्या साफसफाईकरिता लाखो रुपये खर्च करण्यात आले. मात्र या वाहिन्यांच्या चेंबरची झाकणे धोकादायक असल्याचे उघड झाले आहे. वर्दळीच्या प्रमुख रस्त्यांसह गल्लीबोळातील सुमारे साडेचारशे चेंबरची दुरवस्था झाल्याचे महापालिकेच्या पाहणीत आढळून आले आहे. त्यापैकी बहुतांश चेंबरवरील लोखंडी जाळ्या तुटल्याने ते वाहनचालकांसाठी जीवघेणे ठरण्याची भीती आहे. चेंबरच्या देखभाल-दुरुस्तीकडे महापालिका त्याकडे काणाडोळा करीत आहे.  

पुणे शहरात सुमारे दीड हजार किलोमीटर लांबीच्या सांडपाणी वाहिन्या (ड्रेनेज लाइन) आहेत, तर सातशे किलोमीटर लांबीची पावसाळी गटारे आहेत. या दोन्ही वाहिन्यांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी जागोजागी चेंबर बसविले असून, त्यांची संख्या दोन हजारांपर्यंत आहे. काही वर्दळीच्या रस्त्यांच्या मध्यभागी चेंबर आहेत. मात्र त्यावरील लोखंडी आणि सिमेंटची झाकणे खराब झाल्याने ती वाहनचालकांसाठी धोकादायक झाली आहेत. त्यातच पावसात रस्त्यांवर पाणी साचत असल्याने वाहनचालकांना चेंबर दिसत नाहीत. त्यामुळे अपघाताची भीती आहे. धनकवडीत दोन वर्षांपूर्वी चेंबरमुळे दुचाकीस्वाराला जीव गमवावा लागल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर जाग आलेल्या महापालिकेच्या पथ विभागाने पाहणी केली, तेव्हा सुमारे पाचशे चेंबरची दुरवस्था झाल्याचा अहवाल मांडण्यात आला. त्यानंतर दुरुस्तीचा देखावा उभारून मोजक्‍याच भागांतील चेंबरची कामे करण्यात आली. त्यामुळे यंदाही सुमारे साडेचारशे चेंबर असुरक्षित असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

पावसाळ्याआधी सांडपाणी वाहिन्या आणि पावसाळी गटारांमधील गाळ काढण्याच्या नावाखाली लाखो रुपये खर्च करण्यात आले. या कामादरम्यान चेंबरची दुरुस्ती करणे अपेक्षित होते. मात्र या जबाबदारीपासून पथ विभाग आणि संबंधित ठेकेदार लांब राहिले आहेत. ऐन पावसाळ्यात चेंबरची स्थिती वाहनचालक आणि पादचाऱ्यांसाठी असुरक्षित असल्याचे स्पष्ट झाले आहे.

पावसाळी कामे करीत असताना सर्व भागांतील चेंबरची पाहणी, तसेच गरजेनुसार त्यांची देखभाल-दुरुस्तीही तातडीने केली आहे. चेंबरमधून रस्त्यावर पाणी येऊ नये, यासाठी साफसफाई करण्यात आली आहे. नादुरुस्त चेंबरची कामे केली जातील. 
- अनिरुद्ध पावसकर, प्रमुख, पथ विभाग, महापालिका

Web Title: Dranage Water Chamber rain care