सांडपाणी प्रकल्पाला स्थगिती

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 21 सप्टेंबर 2019

स्‍थानिकांचा विरोध
परिसरात सुमारे १५ हजार नागरिक वास्तव्यास आहेत. त्यांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ नये, यासाठी नागरिकांनी तीव्र विरोध करीत प्रकल्प बंद करण्याची मागणी केली आहे. यापूर्वी आंदोलनही केले आहे.

पिंपरी - महापालिकेतर्फे चिखली येथे इंद्रायणी नदी पात्रालगत सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारला जात आहे, त्याला हरित लवादाने स्थगिती दिली.

पर्यावरणाची हानी होऊ नये व नदीचे सौंदर्य अबाधित राहावे, यासाठी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाविरोधात जून २०१९ मध्ये फेडरेशन ऑफ रिव्हर रेसिडेन्सीने उच्च न्यायालयात तक्रार दाखल केली होती. हा प्रकल्प अनधिकृतपणे इंद्रायणी नदी पात्रालगत निळ्या पूररेषेत महापालिका उभारत आहे. याबाबत तक्रार करूनही महापालिकेने काम सुरूच ठेवले. त्यामुळे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तक्रार केली. मंडळाने महापालिकेला नोटीस बजावली. तरीही काम सुरूच राहिल्याने रिव्हर रेसिडेन्सीने हरित लवादाकडे न्याय मागितला. त्यावर सुनावणी होऊन लवादाने २२ जून रोजी सविस्तर अहवाल मागविला. त्यानुसार ६ जुलैला स्थळ पाहणी करण्यात आली. त्यानंतर अंतिमत: प्रकल्पाला स्थगिती दिली. सद्यःस्थितीत प्रकल्पाची पाया भरणी व सीमाभिंत बांधणीचे काम पूर्ण झाले आहे. पावसाळा असल्यामुळे नदीला पूर आलेला असून प्रकल्पाचे ठिकाण पाण्याखाली गेले आहे. 

महापालिकेने सदर जागा प्रकल्पासाठी आरक्षित केली आहे. नदी प्रदूषण रोखण्यासाठी हा प्रकल्प इतरत्र स्थलांतरित करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. रिव्हर सोसायटीतर्फे ॲड. अंकुर मित्तल, अंकुर सब्बू व पराग गांधी यांनी बाजू मांडली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dranage Water Project Postponement