कुरकुंभ : वीज पुरवठा बंद केल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर | Electricity Cutting | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Electricity-Cutting
कुरकुंभ : वीज पुरवठा बंद केल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर

कुरकुंभ : वीज पुरवठा बंद केल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर

कुरकुंभ - दौंड तालुक्यातील शेतीपंपाची वीजबिल थकबाकी वसुलीसाठी वीज वितरण कंपनीने चार दिवसांपासून थ्री-फेज वीज पुरवठा बंद केल्याने शेतामध्ये व वाडयावस्त्यावर राहणाऱ्या शेतकरी, ग्रामस्थ व जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. वीजबिल भरणारांनाही याचा फटका सहन करावा लागत असून वीजप्रवाह पूर्ववत न केल्यास रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा संताप शेतकऱ्यांनी दिला आहे.

तालुक्याच्या ग्रामीण भागात ग्रामपंचायत हद्दीतील अनेक वाडयावस्त्यांना आजही पाण्याचा पुरवठा योजनेतून होत नाही. त्यांना खाजगी विहिरीच्या पाण्यावर अवलंबून रहावे लागते. तर काही ग्रामस्थ शेती करण्याच्या हिशोबाने शेतात घरे व जनावरांचे गोठे बांधले आहेत. त्यांना पिण्याच्या व वापराच्या पाण्यासाठी शेतीपंपावर अवलंबून रहावे लागते. अनेक शेतकऱ्यांनी दोनतीन किलोमीटर अंतरावरून पाईपलाईनद्वारे पाणी आणले आहे. मात्र चार दिवसांपासून वीज वितरण कंपनीने थकबाकी वसुलीसाठी थ्री फेज वीज पुरवठा बंद केला आहे. रोहित्रही बंद आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे शेतीपंप बंद आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील वाडयावस्त्यावर व शेतात राहणारे ग्रामस्थ, शेतकरी व जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा गंभीर बनला आहे. तसेच पिकांना पाणी देणे अवघड झाले आहे.

हेही वाचा: पुणे जिल्ह्यातील आठ बाजार समित्यांच्या निवडणुकांची प्रक्रिया स्थगित

पाणी पाईपलाईनद्वारे लांब अंतरावरून आणल्याने डोक्यावरून पाणी आणणे शक्य होत असल्याने शेतकरी व महिलांना पाण्याने आण्याचा त्रास सहन करावा लागत आहे. यापूर्वी थकबाकी वसुलीसाठी वीजप्रवाह बंद केला होता. त्यावेळी प्रत्येक शेतीपंप धारकांकडून पाच हजार रूपये भरून घेऊन वीजप्रवाह चालू करण्यात आला होता. मात्र यावेळी वैयक्तिक कनेक्शन सोडण्याऐवजी वीज वितरण कंपनीने वरूनच थ्री फेज वीजप्रवाह बंद करून प्रत्येकी दहा हजार रूपये भरण्यास शेतकऱ्यांना सांगितले जात आहे. यामध्ये रेग्युलर वीजबिल भरणारेही भरडले जात आहेत.

पिकांचे वेगवेगळया कारणांनी नुकसान झाल्याने सध्या शेतकऱ्यांकडे पैसे भरण्याचे कोणतेही साधन नाही. ऊस कारखान्याला गेल्यानंतर बिले भरणे शक्य होईल. शेतीपंपाचा वीजप्रवाह बंद करून शेतकऱ्यांचे आणखी नुकसानच होणार असल्याने वीजबिल भरण्यात अडचणी निर्माण होती. म्हणून वीजप्रवाह पूर्ववत करावा अशी मागणी खडकी (ता. दौंड) येथील रघुनाथ काळे व इतर शेतकऱ्यांनी केली आहे. थ्री फेज वीजप्रवाह त्वरित सुरू न केल्यास रास्ता रोको आंदोलनसारखा मार्ग अवलंबवावा लागेल असा इशारा अनेक गावांमधील शेतकऱ्यांनी दिला आहे.

loading image
go to top