पुणे जिल्ह्यातील आठ बाजार समित्यांच्या निवडणुकांची प्रक्रिया स्थगित | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Voting
पुणे जिल्ह्यातील आठ बाजार समित्यांच्या निवडणुकांची प्रक्रिया स्थगित

पुणे जिल्ह्यातील आठ बाजार समित्यांच्या निवडणुकांची प्रक्रिया स्थगित

sakal_logo
By
संतोष शेंडकर

सोमेश्वरनगर - कृषी सोसायट्यांच्या निवडणुका झाल्यानंतरच बाजार समित्यांच्या निवडणुका घ्याव्यात असा निर्णय राज्य सहकार निवडणूक प्राधीकरणाने घेतला आहे. यामुळे पुणे जिल्ह्यातील आठ बाजार समित्यांच्या निवडणुकांची प्रक्रिया स्थगित होऊन रणधुमाळी थंडावली आहे. यामुळे इच्छुकांचा हिरमोड झाला आहे. मात्र ज्यांना बाजार समितीत काम करायचे आहे त्यांच्यापुढे सोसायटी आणि ग्रामपंचायतीमध्ये निवडून येण्याचे आव्हानही निर्माण झाले आहे.

कोरोना संसर्गामुळे राज्यातील बाजार समित्यांच्या निवडणुका प्रलंबित होत्या. राज्य निवडणुक सहकार प्राधीकरणाने या निवडणुका १६ डिसेंबर ते १७ जानेवारी या कालावधीत घेण्याचे निश्चित केले होते. त्यानुसार मतदार याद्या तयार करण्याची प्रक्रियाही सुरू होती. प्रारूप मतदारयाद्या हरकीतसाठी मांडण्यात आल्या होत्या. बाजार समितीवर विकास सोसायट्यांचे संचालक व ग्रामपंचायतीचे सदस्य हे मतदान करतात आणि उमेदवारी अर्ज भरण्याचा अधिकार त्यांनाच असतो. परंतु बहुतांश सोसायट्यांच्या निवडणुका प्रलंबित असून चार हजार ग्रामपंचायतींच्या सुमारे सात हजार जागांवरील पोटनिवडणुकाही प्रलंबित होत्या. त्यामुळे बाजार समित्यांसाठी सध्या तयार करण्यात आलेल्या मतदार याद्यांमध्ये हेच जुने संचालक व ग्रामपंचायत सदस्य मतदार म्हणून निश्चित झाले होते. परंतु जिंतूर बाजार समितीच्या मतदारयादीवर औरंगाबाद खंडपीठात हरकत घेण्यात आली होती. त्यानंतर न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार राज्य प्राधीकरणाने जोपर्यंत सोसायट्यांच्या निवडणुका होत नाहीत तोपर्यंत बाजार समितीच्या निवडणुका स्थगित ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक यांच्याकडून बाजार समित्यांना यासंदर्भात कळविले जाणार आहे.

हेही वाचा: हडपसर : मगर रुग्णालयातील लहान मुलांचे कोव्हिड सेंटर सज्ज

पुणे जिल्ह्यातील नीरा, खेड, जुन्नर, मंचर आणि भोर या पाच बाजार समित्यांच्या निवडणुकासाठी १६ डिसेंबरपासून नामनिर्देशनपत्र दाखल केले जाणार होते. त्यादृष्टीने प्रारूप मतदार याद्याही प्रदर्शित करण्यात आल्या होत्या.

कालपर्यंत त्यावर हरकतीही मागविल्या होत्या. तसेच बारामती, दौंड आणि इंदापूर या बाजार समित्यांच्या निवडणुकांच्या मतदार याद्या तयार करण्याचे काम सुरू करण्यात आले होते. त्यामुळे अनेकजण निवडणुकीच्या तयारीत होते त्यांचा हिरमोड झाला आहे. अनेकांसाठी सोसायटीचे संचालक पद संपत आले होते मात्र तसे असतानाच बाजार समितीवर वर्णी लागण्यासाठी धडपड सुरू होती. आता मात्र नवीन निवडून येणाऱ्या लोकांसाठी मतदानाची आणि उमेदवारीची ही नामी संधी असणार आहे. पुणे जिल्ह्यातील ३१७ ग्रामपंयाततील ५०३ जागांसाठी २१ डिसेंबरला पोटनिवडणुक होत आहे. तसेच बहुतांश सोसायट्यांच्या निवडणुकाही प्रलंबित आहेत.

जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक मिलिंद सोबोले म्हणाले, औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशानुसार राज्य प्राधीकरणाने विकास सोसायट्यांच्या निवडणुका होत नाहीत तोपर्यंत बाजार समित्यांच्या निवडणुका स्थगित ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार आम्ही बाजार समित्यांना सूचना देणार आहोत. जिल्ह्यातील पाच बाजार समित्यांच्या प्रारूप मतदार याद्या तयार होत्या तर तीनची तयारी सुरू होती.

loading image
go to top