पिण्यासाठी पाणी नाही, तर उद्यान कोठून मिळणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

drinking water

उंड्री, पिसोळी, हांडेवाडी, औताडेवाडी, वडाचीवाडी, होळकरवाडी गावामध्ये उद्याने नाहीत.

पिण्यासाठी पाणी नाही, तर उद्यान कोठून मिळणार

उंड्री - महापालिका प्रशासनाचा कारभार सुरू झाला की, रस्ते, पाणी, वीज, आरोग्य, शिक्षण आणि उद्यान अशा सुविधा मिळतील असे वाटले होते. सारसबाग, राजीव गांधी उद्यान, पेशवे उद्यान, संभाजी उद्यान अशी काही मोजकी उद्याने ऐकून माहिती आहेत. मात्र, उद्यान म्हणजे काय रे भाऊ, असा खोचक सवाल समाविष्ट गावातील नागरिकांनी उपस्थित केला आहे.

उंड्री, पिसोळी, हांडेवाडी, औताडेवाडी, वडाचीवाडी, होळकरवाडी गावामध्ये उद्याने नाहीत. पिण्यासाठी पाणी नाही, खेळण्यासाठी मैदान नाही, तर उद्यान, सांस्कृतिक केंद्र अशा सुविधा आमच्यापासून कोसो दूर आहेत. उद्यान, पाणी, पथदिवे, रस्ते अशा किमान सुविधा पाहण्यासाठी प्रशासनाने किमान दुर्बिन दिल्यानंतर तरी पाहता येतील, अशी विचारणा उंड्रीतील खंडेराव जगताप यांनी केली.

महमंदवाडीतील काळेबोराटेनगरमध्ये स.नं.४८ मध्ये स्व. गोपीनाथ मुंढे उद्यानाचा शुभारंभ २०१८ साली करण्यात आला. त्यानंतर उद्यानाची सीमाभिंत, जॉगिंग ट्रॅक बनविण्यात आला. दरम्यानच्या काळात कोरोनामुळे लॉकडाऊनमध्ये उद्यानाची मोठ्या प्रमाणात नासधूस झाली आहे. उद्यानामध्ये गवत आणि बाभळीची झाडे उगविली आहेत. वीस वर्षांपूर्वी महापालिकेत समाविष्ट झाल्यानंतर २०१७ स्व. गोपीनाथ मुंढे उद्यान विकसित करण्याचा शुभारंभ झाला. मात्र, या उद्यानामध्ये अद्याप स्ट्रीट लाईट बंद अवस्थेत, स्वच्छतागृह बंद आहे, पिण्याचे पाणी नाही, व्यायामाचे साहित्य नाही, बसण्यासाठी बाके नाहीत.

पालिकेचे मुख्य उद्यान अधीक्षक अशोक घोरपडे म्हणाले की, उद्यान विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले की, मागिल दोन वर्षे कोरोनामुळे सर्वच कामे ठप्प होती. आता कामे सुरू झाली आहेत, टप्प्याटप्प्याने उद्यानांचाही विकास होईल, असे त्यांनी सांगितले.