चूक दाखवा आणि बक्षीस मिळवा

ब्रिजमोहन पाटील
बुधवार, 14 ऑगस्ट 2019

‘गिफ्ट कूपन्स’ देऊन शिस्तप्रिय चालकांना सन्मान केला. आता नियमांचे उल्लंघन केल्यानंतर त्याचे छायाचित्र ॲपवरून पाठवावे लागेल. तक्रारी देणाऱ्यांपैकी ५० जणांना ‘गिफ्ट कूपन’ दिले जाईल व त्यांचे आभार मानले जाणार आहेत. यामुळे बेशिस्त चालकांना वठणीवर आणता येईल.
- डॉ. के. वेंकटेशम, पोलिस आयुक्त, पुणे

पुणे  - दुसऱ्यांची चूक पकडण्यात आणि कान टोचण्यात पुणेकर एकदम पटाईत आहेत. त्यांच्या याच गुणाचा वापर करून बेशिस्त वाहनचालकांना धडा शिकविण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला आहे. कोणत्याही वाहतुकीच्या नियमाचे उल्लंघन करणाऱ्या वाहनाचा नंबर आणि छायाचित्र ‘सतर्क पुणेकर’ ॲपवरून पोलिसांना पाठविणाऱ्या तक्रादाराला बक्षीस दिले जाणार आहे. 

शहरात वाहतुकीची शिस्त पाळणाऱ्या वाहनचालकांचा सन्मान करण्यासाठी नुकतीच ‘आभार’ योजना पोलिसांनी सुरू केली होती. ज्यांच्यावर एकही दंडाची पावती नाही, अशा सुमारे ३६ हजार चालकांना ‘गिफ्ट कूपन’ देण्यात आले होते. आता पोलिसांनी सिग्नल तोडणे, नो पार्किंगमध्ये गाडी लावणे, ट्रिपलसीट, नो एंट्री, झेब्रा क्रॉसिंग, सीटबेल्ट न लावणे, गाडी चालवताना मोबाईलवर बोलणे, यांसह इतर नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांची माहिती देणाऱ्यांना बक्षीस देण्याचे ठरविले आहे. 

वाहतूक उपायुक्त पंकज देशमुख म्हणाले, सतर्कवरून ज्या तक्रारी आल्या आहेत, त्याची पडताळणी केली जाईल. त्या योग्य असतील त्यांचेच चलन काढले जाईल. हे गिफ्ट कूपन रोज फक्त ५० जणांना दिले जाईल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Driver Problem Complaint Police