#DriverIssue पुण्यात चक्क ड्रायव्हरचा तुटवडा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 जानेवारी 2020

शहरातील युवक ड्रायव्हरचे काम करण्यास तयार नसतात. त्यामुळे ग्रामीण भागातून युवकांना आणून प्रशिक्षण देऊन त्यांना नोकरी द्यावी लागत आहे. कुशल ड्रायव्हर मिळणे, हे आव्हान झाले आहे. मागणीच्या तुलनेत ड्रायव्हरचा पुरवठा मार्केटमध्ये कमी आहे. 
- बाळासाहेब खेडेकर, अध्यक्ष, पुणे डिस्ट्रिक्‍ट लक्‍झरी बस असो.

पुणे - पीएमपीच्या बस असो अथवा प्रवासी वाहतूक करणाऱ्या खासगी बस, ड्रायव्हरचा तुटवडा आता त्यांना भासू लागला आहे. त्याचा परिणाम वाहतूक व्यवसायावर होऊ लागला आहे. सामाजिक प्रतिष्ठेपासून कमी मोबदल्यासारख्या अनेक कारणांमुळे ड्रायव्हर म्हणून काम करण्यास शहरातील युवक अनुत्सुक आहेत. त्यांची जागा ग्रामीण भागातील युवक पटकावू लागले आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पीएमपीमध्ये हंगामी ड्रायव्हरला सुमारे १८ हजार रुपये दरमहा पगार देण्याची प्रशासनाने तयारी दर्शविली आहे. तरीही त्यांना पुरेसे ड्रायव्हर मिळालेले नाहीत. तर, प्रवासी वाहतूक करणाऱ्या खासगी बस व्यावसायिकांनाही सध्या ड्रायव्हरचा तुटवडा भासत आहे.

व्यावसायिक हे ड्रायव्हरला दरमहा पगारासह भत्तेही देतात. त्यामुळे त्यांना दरमहा १५ ते २५ हजार रुपयांपर्यंत उत्पन्न मिळत आहे. तरीही या व्यावसायिकांना ड्रायव्हर मिळेनासे झाले आहेत. त्यावर उपाय म्हणून काही व्यावसायिक मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आदी ठिकाणी जाऊन कॅंप आयोजित करतात. ड्रायव्हरची निवड करतात आणि शहरात आणून त्यांना प्रशिक्षण देतात. ड्रायव्हरचा तुटवडा केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर कर्नाटक, तमिळनाडू, आंध्र प्रदेश, राजस्थान, गुजरात आदी विविध राज्यांत भासत आहे, असे या क्षेत्रातील जाणकारांनी सांगितले. 

Video : पुण्यात जिल्ह्याधिकारी कार्यालयासमोर कामगार संघटनाचा मोर्चा

शहरी भागातील युवकांना ड्रायव्हरचे काम करण्यास सामाजिकदृष्ट्या कमी दर्जाचे वाटते. त्यापेक्षा त्यांचा कल आता कॅब व्यवसायाकडे वाढला आहे. नोकरी करण्यापेक्षा स्वतःची गाडी घेऊन कॅब व्यवसाय केल्यास आर्थिक परतावाही चांगला मिळतो आणि स्वातंत्र्यही मिळते, असाही त्यामागे विचार आहे. या पद्धतीने विचार करणाऱ्यांची संख्या वाढत असल्यामुळेही व्यावसायिकांना ड्रायव्हर्सची टंचाई भासत आहे, असे काही वाहतूक व्यावसायिकांनी सांगितले.

पुणे पोलिसच होतायेत ट्विटरवर ट्रेंड; वाचा काय घडले?

पीएमपीमध्ये गाड्यांसाठीही पुरेशा संख्येने ड्रायव्हर मिळत नाहीत. कंडक्‍टरसाठी किमान १० हजार अर्ज येतात. परंतु, ड्रायव्हरच्या बाबतीत तसे होत नाही. सामाजिक प्रतिष्ठेमुळे ड्रायव्हरचा तुटवडा आहे. 
- अनंत वाघमारे, वाहतूक व्यवस्थापक, पीएमपी

प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या खासगी बसलाही ड्रायव्हरचा तुटवडा भासू लागला आहे. कॅबमुळे ड्रायव्हर नोकरीऐवजी व्यवसायात उतरत आहेत. परिणामी आम्हाला ड्रायव्हर शोधून आणून त्यांना प्रशिक्षण द्यावे लागत आहे. त्यांची टिकण्याची खात्री नसते. 
- प्रसन्न पटवर्धन, वाहतूकदार

खासगी मोटारीवर गेली ३० वर्षे मी ड्रायव्हर म्हणून काम करतो. पत्नी धुणी-भांड्याची कामे करायची. दोन मुलांना चांगले शिकविले. ते आता नोकरी करतात. नवी पिढी ड्रायव्हरचे काम करण्यास इच्छुक नाही. पुढच्या काळात ड्रायव्हरची टंचाई अजून जाणवणार आहे.
- संतोष शिंदे, ड्रायव्हर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Driver shortage in pune