लायसेन्स, आरसी आता डिजिलॉकरमध्येही!

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 25 मे 2018

पुणे - वाहन चालविण्याचा परवाना (लायसेन्स) आणि नोंदणी प्रमाणपत्र (आरसी) आता नागरिकांच्या डिजिटल लॉकरमध्येही उपलब्ध होणार आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालयाने त्यासाठी 2006 पासूनची माहिती संगणकीकृत केली आहे. त्यामुळे लायसेन्स, आरसी बुक नागरिकांना आता एका क्‍लिकवर कोठेही उपलब्ध होऊ शकेल.

पुणे - वाहन चालविण्याचा परवाना (लायसेन्स) आणि नोंदणी प्रमाणपत्र (आरसी) आता नागरिकांच्या डिजिटल लॉकरमध्येही उपलब्ध होणार आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालयाने त्यासाठी 2006 पासूनची माहिती संगणकीकृत केली आहे. त्यामुळे लायसेन्स, आरसी बुक नागरिकांना आता एका क्‍लिकवर कोठेही उपलब्ध होऊ शकेल.

केंद्र सरकारने डिजिटल लॉकर सुरू केला आहे. त्यात नागरिक त्यांची शैक्षणिक प्रमाणपत्रे, पॅन कार्ड, आधार कार्ड, पासपोर्ट आदी विविध प्रकारची कागदपत्रे ठेवू शकतात. डिजिटल लॉकरमध्ये अकाउंट उघडण्यासाठी नागरिकांकडे आधार कार्ड आणि त्याला संलग्न मोबाईल क्रमांक असणे आवश्‍यक आहे. तेथे अकाउंट ओपन केल्यावर लायसेन्स, आरसी बुक तेथे थेट पोचू शकते, त्यामुळे नागरिक हवे तेव्हा त्याचा वापर करू शकतात. दहावी- बारावीचे प्रमाणपत्र, गुणपत्रिका जुन्या असल्या तरी स्कॅन करून पीडीएफ फॉरमॅटमध्ये डिजिटल लॉकरमध्ये ठेवता येतील. तसेच, आरटीओकडून नव्याने दिली जाणारी कागदपत्रेही थेट संबंधित नागरिकांच्या डिजिटल लॉकरमध्ये जमा होऊ शकतात. त्यावर डिजिटल स्वाक्षरी असल्यामुळे न्यायालयातही ते ग्राह्य धरले जाऊ शकतात. संस्थात्मक स्तरावरही डिजिटल लॉकरचा वापर शक्‍य आहे. आरटीओमध्ये कार्यान्वित करण्यात आलेल्या नव्या संगणक प्रणालीमुळे हे शक्‍य झाले आहे, अशी माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी बाळासाहेब आजरी यांनी दिली. या प्रसंगी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय राऊत उपस्थित होते.

डिजिलॉकर सुविधा ऍपवरही शक्‍य
डिजिलॉकरसाठी ऍपही गुगल प्ले स्टोअरमध्ये उपलब्ध आहे. आधार कार्डच्या क्रमांकाद्वारे त्याचाही वापर करणे शक्‍य आहे. त्याबाबतची अधिक माहिती केंद्र सरकारच्या digilocker.gov.in या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे, असे "नॅशनल इन्फॉर्मेटिक सेंटर'चे (एनआयसी) टेक्‍निकल डायरेक्‍टर दीपक सोनार यांनी सांगितले.

मोबाईलवर दाखवा लायसेन्स
डिजिलॉकरच्या ऍपचा वापर मोबाईलवर करता येऊ शकतो. त्यामुळे पोलिसांना लायसेन्स, आरसी बुकची तपासणी करायची असेल, तर डिजिलॉकरमधील तपशील त्यांना दाखविता येऊ शकतो. केंद्र सरकारचेच ऍप असल्यामुळे त्याला कायदेशीर मान्यता आहे. पोलिसांकडील उपकरणातून त्याची सत्यता पडताळणी करणेही शक्‍य आहे, असेही आजरी यांनी स्पष्ट केले.

Web Title: driving license RC in digilocker