महाबॅंक अधिकाऱ्यांवरील कारवाईची चौकशी होणार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 25 जून 2018

पुणे - बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांच्या कंपन्यांना नियमबाह्य कर्जवाटप केल्याप्रकरणी बॅंक ऑफ महाराष्ट्रच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर केलेल्या कारवाईची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेतली आहे. या चुकीच्या कारवाईमुळे बॅंकिंग क्षेत्रातून नाराजी व्यक्त होऊ लागल्याने मुख्यमंत्र्यांनी अतिरिक्त पोलिस महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमण्याचे आदेश दिले आहेत.

डीएसके प्रकरणात बॅंक ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष रवींद्र मराठे यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांना ठेवीदारांचे हितसंबंधांचे रक्षण करणाऱ्या कायद्याअंतर्गत (एमपीआयडी) पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली होती. मात्र, हा कायदा ठेवीदारांची फसवणूक करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध आहे. बॅंक अधिकाऱ्यांनी केवळ कर्ज मंजूर केले. त्यामुळे पोलिसांनी केलेली कारवाई ही रिझर्व्ह बॅंकेच्या नियमांचे उल्लंघन करणारी असल्याचा आरोप बॅंकिंग क्षेत्रातून होऊ लागला आहे.

बॅंक अधिकाऱ्यांवरील कारवाई ही रिझर्व्ह बॅंकेच्या नियमांचे उल्लंघन करणारी असल्याचे एका केंद्रीय मंत्र्याने मुख्यमंत्री फडणवीस यांना सांगितले होते. त्यावरून मुख्यमंत्र्यांनी पोलिसांची कानउघडणी केल्याची चर्चा सुरू होती. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी पोलिसांच्या या कारवाईची चौकशी करण्यासाठी समिती नेमण्याचा आदेश दिला आहे. 

पोलिसांकडून बॅंक अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची पद्धत अयोग्य आहे. त्यामुळे या प्रकरणाच्या सखोल चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. कोणावर अन्याय होता कामा नये.
-देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री 

Web Title: DSK case Bank of Maharashtra Chairman Ravindra Marathe