'डीएसकें'च्या दोन कंपन्यांवर 52 कोटींच्या व्हॅटचोरीबद्दल गुन्हे

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 21 जुलै 2018

पुणे - गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याबद्दल तुरुंगात असलेले बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांच्या अडचणींत आणखी वाढ झाली आहे. त्यांच्या डीएसके डेव्हलपर्स आणि डीएसके मोटर्स या कंपन्यांवर आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे. या दोन्ही कंपन्यांनी एकूण सुमारे 52 कोटी रुपयांचा मूल्यवर्धित कर (व्हॅट) चुकविल्याचे राज्याच्या विक्रीकर विभागाने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

डी. एस. कुलकर्णी हे डीएसके डेव्हलपर्स आणि डीएसके मोटर्स या दोन्ही कंपन्यांवर संचालक आहेत. शिवाजीनगरमध्ये कार्यालय असलेल्या डीएसके डेव्हलपर्स या कंपनीने 2006 ते 2009 दरम्यान ग्राहकांकडून वसूल केलेल्या व्हॅटची सुमारे 13 कोटी सहा लाख 99 हजार 503 रुपयांची रक्कम विक्रीकर विभागाकडे भरली नाही, असे विभागाने म्हटले आहे. तर, डीएसके मोटर्स कंपनीने 2013 ते 2016 दरम्यान ग्राहकांकडून व्हॅट वसूल करून त्याची 39 कोटी 19 लाख 43 हजार 297 रुपयांची रक्कम विक्रीकर विभागाकडे भरलेली नाही, असे फिर्यादीत नमूद केले आहे. याबद्दल फसवणूक, अपहार, विश्‍वासघात आदी कलमांन्वये कुलकर्णी यांच्या दोन कंपन्यांवर शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. त्यात कुलकर्णी यांच्यासह अन्य तिघांचा समावेश आहे.

Web Title: DSK company 52 crore VAT theft crime