Video : शिक्षणासाठी थेट घरात विद्यावाहिनी - वर्षा गायकवाड

शिवाजीनगर - ई-बालभारतीमध्ये शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी व्हर्च्युअल क्‍लासरूमद्वारे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
शिवाजीनगर - ई-बालभारतीमध्ये शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी व्हर्च्युअल क्‍लासरूमद्वारे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

पुणे - शालेय विद्यार्थ्यांना थेट घरामध्येच शैक्षणिक मार्गदर्शन मिळावे म्हणून शालेय शिक्षण विभागातील दूरचित्रवाहिनीवर (डीटीएच) ‘विद्यावाहिनी’ सुरू होणार आहे. तसेच, शिक्षकांच्या प्रशिक्षणासाठीदेखील उपक्रम सुरू केला जाणार असल्याची घोषणा शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केली. या वाहिनीवर पाठ्यक्रमाबरोबरच, स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन आणि साहित्यिकांच्या मुलाखतीही दाखविल्या जातील.

आगरकर रस्त्यावरील ई-बालभारतीमध्ये व्हर्च्युअल क्‍लासरूमच्या उद्‌घाटनानंतर त्या पत्रकारांशी बोलत होत्या. पूर्वप्राथमिक शाळेतील लहान मुलांना सकाळची शाळा असते. या वेळा बदलणार का, या प्रश्‍नावर त्या म्हणाल्या, ‘‘अनेक गोष्टींमध्ये बदल करण्याची मागणी आहे; परंतु हा बदल करताना फक्त विद्यार्थ्यांचा विचार करून चालणार नाही.

त्यामुळे त्यासाठी तज्ज्ञांशी आणि संबंधित घटकांशी चर्चा करूनच निर्णय घेतला जाईल. राज्याकडून ज्या शिष्यवृत्ती दिल्या जातात, त्या योजनांचे पुनर्विलोकन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्याचा आढावा तज्ज्ञांसमोर ठेवून त्यातही बदल करण्याबरोबर रकमेतील वाढीबाबत निर्णय घेऊ.’’

पूर्वप्राथमिक वर्गाच्या प्रवेशासाठी अवाजवी शुल्क आकारणीही केली जाते. याबाबत त्या म्हणाल्या, ‘‘पूर्वप्राथमिकची प्रवेश पद्धती कशी असावी, याचा विचार झाला आहे. येत्या महिनाभरात त्याबद्दल निर्णय होईल.’’

शाळेची गुणवत्ता वाढवायची असेल, तर शिक्षकांची गुणवत्ता वाढली पाहिजे, त्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेमार्फत उपक्रम सुरू करण्यात येणार आहेत. त्यासाठी निधीदेखील दिला जाणार आहे. तसेच, अंशतः अंध विद्यार्थ्यांना परीक्षेवेळी प्रश्‍नपत्रिकेवरील अक्षरे वाचण्यात अडचणी येतात अशी तक्रार येते, त्यामुळे राज्य शिक्षण मंडळ मोठ्या फाँटच्या प्रश्‍नपत्रिका तयार करेल.
- वर्षा गायकवाड, शालेय शिक्षणमंत्री

विद्यार्थ्यांना शाबासकीची थाप
तुम्ही खेळामध्ये भाग घेतला का, तुम्ही विश्रांतीच्या वेळी काय करता, असे अनेक प्रश्‍न विचारत आज राज्याच्या विविध भागांतील जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांनी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची मुलाखत घेतली. यातून निर्भीड आणि हुशार असल्याची चुणूक या विद्यार्थ्यांनी दाखविली. तुम्ही असे प्रश्‍न विचारता आहात की तुमच्यात मला वर्षा गायकवाड दिसते, अशी शाबासकी त्यांनी मुलांना दिली.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

राज्यातील सातशेहून अधिक शाळा व्हीसॅटच्या माध्यमातून ई-बालभारतीशी जोडल्या जाणार आहेत, त्यासाठी अद्ययावत तीन व्हर्च्युअल क्‍लासरूम तयार करण्यात आल्या आहेत. त्याचे उद्‌घाटन गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले. याच क्‍लासरूममधून नगर, कोल्हापूर, नांदेड, उस्मानाबाद यांसह विविध जिल्ह्यांतील शाळांमधील विद्यार्थी आणि शिक्षकांशी संवाद साधला. सुमारे दोनशे शाळा आज या व्हर्च्युअल क्‍लासरूमशी जोडल्या गेल्या होत्या. शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी, शिक्षण संचालक दिनकर पाटील, राज्य शिक्षण मंडळाच्या अध्यक्ष डॉ. शकुंतला काळे या वेळी उपस्थित होत्या.

नेवासा तालुक्‍यातील बऱ्हाणपूर शाळेतील कार्तिकने, ‘‘या क्‍लासरूमच्या माध्यमातून कोणते शिक्षण मिळणार?’’ असा प्रश्‍न विचारला. त्यावर गायकवाड यांनी त्याच्या निर्भीडपणाला दाद देत, तुमच्या पाठ्यपुस्तकातील अभ्यासाबरोबरच इतर तज्ज्ञ तुमच्या भेटीला येतील आणि या क्‍लासरूमद्वारे तुम्हाला मार्गदर्शन करतील, असे त्यांनी सांगितले.

नांदेड जिल्ह्यातील मचनूर शाळेतील ऋतुजाने, ‘विश्रांतीच्या वेळी काय करता’, असा प्रश्‍न विचारताच उपस्थितांमध्ये हशा पिकला. त्यावर उत्तर देताना गायकवाड म्हणाल्या, ‘‘मुलांबरोबर खेळते, मला वाचायला आवडते म्हणून वाचन करते. आई-वडिलांवर माझे खूप प्रेम आहे, त्यामुळे त्यांच्याबरोबर जास्तीत जास्त वेळ घालविते.’’

तिरवंडीच्या, स्नेहल जगतापने विचारलेल्या ‘तुम्ही खेळात भाग घेतला का,’ या प्रश्‍नावर गायकवाड यांनी मार्गदर्शन केले. ‘‘मी तुमच्यासारखी मराठी शाळेत शिकले. खेळात भाग घेत राहिले; पण पुढे अभ्यासही करावा असे वाटू लागले. गणितात एमएस्सी केले. पीएचडीदेखील करायची होती. तुम्हीदेखील खेळा-बागडा आणि अभ्यास करून मोठे व्हा,’’ असे त्या म्हणाल्या.

‘विद्यार्थी घडवूया’
शिक्षक ते शिक्षणमंत्री हा प्रवास कसा होता आणि त्यातून काय शिकायला मिळाले, असा प्रश्‍न एका शिक्षिकेने विचारल्यावर वर्षा गायकवाड म्हणाल्या, ‘‘मीदेखील तुमच्यासारखी एक शिक्षिका होते, नंतर आमदार- मंत्री झाले. त्यामुळे तुम्हाला, विद्यार्थ्यांना मी समजून घेऊ शकते. शासन आणि शिक्षक, विद्यार्थी हे शिक्षण व्यवस्थेचे अंग आहे. त्यांच्यातील अंतर कमी करायचे आहे. चांगला विद्यार्थी घडविण्यासाठी आपण प्रयत्न करूयात.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com