काम रखडल्याने सुखसागरनगरमधील बहुउद्देशीय इमारत बनली मद्यपींचा अड्डा

daru.jpg
daru.jpg

कात्रज (पुणे) : सुखसागर नगर येथील अहिल्यादेवी होळकर बहुउद्देशीय इमारत, बचत गट हॉल महिला प्रशिक्षण केंद्राचे काम गेल्या काही दिवसांपासून रखडले आहे. इमारतीचे काम रखडल्याने ही इमारत मद्यपींचा अड्डा बनली आहे. इमरतीच्या अनेक भागात मद्यपींनी दारूच्या रिकाम्या बाटल्या टाकल्याचे चित्र आहे. रात्री अपरात्री मद्यपी इमारतीत येऊन मद्यपान करतात. त्यामुळे भागातील नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. तसेच, बचत गट हॉलसाठी महिलांना प्रतिक्षाच करावी लागणार असल्याचे दिसत आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

राजकीय दुष्टचक्रात हे काम गेल्या चार वर्षापासून रखडले आहे. काम बंद पडल्याने येथे मद्यपींनी ठाण मांडले. इमारतीत बाटल्यांचा खच पडलेला दिसतो. अशावेळी हे काम लवकर व्हावे, ही अपेक्षा आहे. त्याचबरोबर तळमळीने व धडाडीने काम करणाऱ्या लोकप्रतिनिधींना निधी कमी पडणार नाही. महत्वाच्या कामांसाठी महापालिकेने लक्ष देऊन निधीची तरतूद करायला हवी, असे स्थानिक नागरिक श्रीराम कुलकर्णी यांनी सांगितले.

तत्कालीन नगरसेवक भारती कदम यांनी मदत करून हे बहुउद्देशीय केंद्र मंजूर केले. त्यानंतर महापौर दत्तात्रय धनकवडे यांच्या हस्ते इमारतीच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. त्यानंतर प्रभाग बदली झाल्यावर प्रकाश कदम यांनी इमारतीसाठी निधी मिळवत काम सुरु केले. २०१९-२० या वर्षात इमारतीच्या अपूर्ण कामासाठी २२ लाख १९ हजार २०१ रुपयांची तरतूदही करण्यात आली होती. कामाचे कार्यादेश १७ सप्टेंबर २०१९ रोजी काढण्यात आले होते. पुढील सहा महिन्यात काम पूर्ण होणे अपेक्षित होते. उपलब्ध निधीनत काम पूर्ण होणे शक्य नव्हते.

या इमारतीत पोलिस मदत केंद्राचेही नियोजन होते. काम रखडल्याने गेली ४ वर्षे भागातील नागरिक पोलिस मदत केंद्राची प्रतिक्षा करत आहेत. सुखसागर नगर ते खंडोबा मंदिर या १५ हजारांच्या आसपास लोकसंख्या असणाऱ्या भागातील नागरिकांना तक्रार निवारण करण्यासाठी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यातच जावे लागत आहे. या भागापासून भारती विद्यापीठ पोलिस ठाणे तीन किलोमीटर अंतरावर असल्याने भागातील नागरिक मोठ्या प्रमाणावर तक्रारी करत आहेत. इमारत लवकर पूर्ण झाल्यास नागरिकांची या त्रासापासून सुटका होणार आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सत्तेत असताना निधी उपलब्ध करुन दिला. परंतु सत्तेतून बाहेर आल्यास सत्ताधाऱ्यानी या इमारतीसांठी दोन वर्षे निधी उपलब्ध करुन न दिल्याने इमारतीचे काम रखडले आहे. आता परत यावर्षी निधी उपलब्ध करुन दिला आहे. त्यामुळे लवकरच काम पूर्ण होईल

- प्रकाश कदम, स्थानिक नगरसेवक

आतापर्यंत निधी उपलब्ध नव्हता. नगरसेवक प्रकाश कदम यांनी ७० लाखांचा निधी उपलब्ध करुन दिला आहे. परंतु, कोरोनामुळे निविदा भरता न आल्याने इमारतीचे काम रखडले आहे. मिळालेल्या निधीमध्ये इमारतीचे काम जवळपास पूर्ण होईल

- भास्कर हांडे, शाखा अभियंता, भवन विभाग, मनपा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com