फसवणूक करून कोट्यवधींची रक्कम लुटणारे दोघे अटकेत

फसवणूक करून कोट्यवधींची रक्कम लुटणारे दोघे अटकेत

पुणे : महाराष्ट्रासह देशातील चार राज्यांमध्ये अधिक व्याजाचे आमिष दाखवून लोकांकडून कोट्यवधी रुपये उकळून केलेल्या आर्थिक गैरव्यवहारातील गॅलॅक्‍सी ग्रुप ऑफ कंपनीज्‌च्या दोन मुख्य संचालकांना राज्य गुन्हे अन्वेषण विभाग व उत्तर प्रदेश दहशतवादविरोधी पथकाने संयुक्त कारवाई करुन लखनौमधून अटक केली.

आरोपी तब्बल वीस वर्षांपासून फरारी होते. गुन्हे अन्वेषण पथकाने तब्बल आरोपींकडून चार कोटी 86 लाख रुपयांची मालमत्ता आरोपींकडून जप्त करण्यात आली. सतीशचंद्र भगवतीप्रसाद मिश्रा (वय 65), रामकृष्ण प्रेमचंद दुबे (वय 58, दोघेही रा. संत कबीर नगर, लखनौ, उत्तर प्रदेश) अशी अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. 

..अशी केली फसवणूक ! 

मिश्रा व दुबे यांनी महाराष्ट्रासह देशातील काही राज्यांमध्ये गॅलॅक्‍सी ग्रुप ऑफ कंपनीज्‌ची 1999 मध्ये स्थापना केली होती. त्याच्याअंतर्गत त्यांनी पुन्हा पाच उपकंपन्यांची स्थापना केली. या सगळ्या कंपन्यांमार्फत नागरीकांना अधिक व्याजाचे आमिष दाखवून लोकांकडून कोट्यवधी रुपयांच्या ठेवी स्विकारल्या.

तसेच लोकांना कोणत्याही प्रकारची रक्कम परत न करता 1999 मध्ये सात कोटी आठ लाख रुपयांचा अपहार करुन कंपनी बंद करुन आरोपींनी महाराष्ट्रातून पळ काढला होता. संबंधित कंपनीच्या महाराष्ट्रात तब्बल 102 शाखा होत्या, त्यामुळे या कंपनीविरुद्ध महाराष्ट्रामध्ये विविध जिल्ह्यांमध्ये आर्थिक फसवणुकीचे 26 गुन्हे दाखल झाले होते. 

...असा लागला तपास ! 

राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या तपासामध्ये आरोपींच्या पाचही कंपन्या रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाकडे गैर बॅंकींग कंपन्या (एनबीएफसी) म्हणून नोंदणीकृत नसल्याचे व कंपनीला ठेवी जमा करण्याचे कोणतेही अधिकार नसल्याचे निष्पन्न झाले होते. दरम्यान, अतुलचंद्र कुलकर्णी यांनी राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या अपर पोलिस महासंचालकपदाची सुत्रे हाती घेतल्यानंतर महत्वाच्या गुन्ह्यातील फरारी आरोपींची माहिती घेण्यास प्राधान्य दिले. त्यामध्ये त्यांना गॅलेक्‍सीचा आर्थिक घोटाळा दिसून आला. त्यानुसार त्यांनी उत्तर प्रदेशच्या दहशतवादविरोधी पथकाचे (एटीएस) अपर पोलिस महासंचालक असीम अरुण यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर उत्तर प्रदेश एटीएस व राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधिकाऱ्यांच्या भरारी पथकाने चार दिवस लखनौ येथे तळ ठोकला. त्यानंतर सापळा रचून दोन्ही मुख्य आरोपींना अटक केली.

यापूर्वी प्रमोदकुमार गंगा पांडे, अमोदकुमार पांडे, घनश्‍याम कालीप्रसाद पांडे, मैफतुल्लाखान अब्दुलमजीद खान, रहेफिरदौस अफताबअहमद सिद्दीकी, सतेंद्र वशिष्ठ त्रिपाठी या आरोपींना उत्तर प्रदेश पोलिसांनी अटक केली आहे. 

राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या आर्थिक गुन्हे शाखेचे उपमहानिरीक्षक जालींदर सुपेकर, पोलिस अधिक्षक (गुन्हे) पल्लवी बर्गे, अपर पोलिस अधिक्षक (भरारी पथक) नरेंद्र गायकवाड, पोलिस उपअधिक्षक विलास भोसले, पोलिस निरीक्षक भास्कर पुल्ली, यशवंत निकम, पोलिस कर्मचारी कृष्णकांत देसाई व दत्तात्रय भापकर यांच्या पथकाने ही कारवाई केली. 

* एकूण फसवणुक - सात कोटी, आठ लाख 49 हजार 226 
* राज्ये - महाराष्ट्र, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, राजस्थान 
* गॅलॅक्‍सी कंपनीच्या महाराष्ट्रातील शाखा - 102 
* महाराष्ट्रात संबंधीत कंपनीविरुद्ध दाखल गुन्हे - 26 
* महाराष्ट्रातील शहरे - वर्धा, नागपुर, अकोला, यवतमाळ, वाशीम, भंडारा, अमरावती, चंद्रपुर, बीड, लातुर, ठाणे, कोल्हापुर, रत्नागिरी 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com