वाळुचोरांच्या सातबारावर बोजा चढविणार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 3 ऑगस्ट 2018

वरवंड - कडेठाण (ता. दौंड) येथील शेतजमीन व ओढ्यात होणाऱ्या बेकायदा वाळू उत्खननाविरुद्ध महसूल विभागाने ठोस भूमिका बजावण्याचे संकेत दिले आहेत. येथील वाळुउपसा झालेल्या शेतजमिनी व संबंधित ठिकाणातील १०३ ब्रास वाळू व ४३१ ब्रास माती उपसाचे तत्काळ पंचनामे करून तहसील कार्यालयात सादर करण्यात आले आहेत.

वरवंड - कडेठाण (ता. दौंड) येथील शेतजमीन व ओढ्यात होणाऱ्या बेकायदा वाळू उत्खननाविरुद्ध महसूल विभागाने ठोस भूमिका बजावण्याचे संकेत दिले आहेत. येथील वाळुउपसा झालेल्या शेतजमिनी व संबंधित ठिकाणातील १०३ ब्रास वाळू व ४३१ ब्रास माती उपसाचे तत्काळ पंचनामे करून तहसील कार्यालयात सादर करण्यात आले आहेत.

पंचनाम्यानुसार संबंधित उत्खनन झालेल्या ठिकाणावर वाळुचोरीच्या रकमेचा तत्काळ बोजा नोंदविण्यात येणार आहे. ज्या वाळुचोरांनी ओढ्यात वाळू व माती उपसा केला, त्यांच्या सातबारा उतारावर बोजा नोंदविण्यात येणार असल्याची माहिती महसूल अधिकाऱ्यांनी दिली. बेकायदा वाळू उपसामुळे ओढ्याचा व शेतजमिनींचा आकार बदलला आहे.

अनेक शेतकरी पैशाच्या लालसेपोटी स्वत:च्या जमिनी वाळुचोरांच्या हवाली करीत आहेत. ओढ्याच्या कडेला वाळुचे साठे करून नंतर त्यांची वाहतूक केली जाते. वाळू वाहतुकीमुळे वरवंड-कडेठाण रस्त्याची दुरवस्था होऊ लागली आहे. कडेठाण हद्दीतील वाळुउपशाची ‘सकाळ’मध्ये बातमी प्रसिद्ध होताच महसूल यंत्रणेने वाळुचोरीविरोधात ठोस भूमिका घेण्याचे संकेत दिले. 

तलाठी सचिन जगताप म्हणाले, ‘‘संबंधीत वाळू उपशाच्या ठिकाणी भेट देऊन वाळुचे अंदाजे १०३ ब्रास, तर मातीचे ४३१ ब्रासचे पंचनामे करण्यात आले आहेत.’’ नियमानुसार नोटिसा बजावून संबंधित लोकांच्या सातबारा उताऱ्यावर रकमेचा बोजा नोंदविण्यात येणार असल्याचे तहसीलदार बालाजी सोमवंशी यांनी सांगितले.

गुन्हा दाखल होऊनही चोरटे मोकाट
कडेठाण येथे वाळुचोरीप्रकरणी तलाठ्याने दिलेल्या फिर्यादीनुसार यवत पोलिसांनी एकावर वाळू चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. मात्र, चार महिने उलटूनही संबंधित वाळुचोरांवर तपासी पोलिस कर्मचाऱ्याने अटकेची कारवाई केली नाही.

बालाजी प्रसन्न
सध्या बेकायदा वाळुउपसा करतानाही वाळुचोर कारवाईची कसलीच तमा बाळगत नाही. याबाबत वाळुचोरांना ‘बालाजी’ प्रसन्न असल्याचे काही जण मिस्कीलपणे सांगत आहे. मात्र, नक्की कोणते ‘बालाजी’ ...देव का अन्य कोणी? याबाबत चर्चेला उधाण आले आहे.

Web Title: Due to illegal sand extraction the size of the cultivators and farmland has changed