कर्मचाऱ्यांअभावी पाटबंधारेपुढे सिंचनाचे मोठे आव्हान

कर्मचाऱ्यांअभावी पाटबंधारेपुढे सिंचनाचे मोठे आव्हान

केडगाव (पुणे) : नवीन मुठा कालव्याचे रब्बीतील पहिले आवर्तन नुकतेच सुरू झाले असले तरी पाणी टंचाईच्या काळात अत्यल्प कर्मचाऱ्यांवर हे आवर्तन कसे काढायचे याचे मोठे आव्हान पाटबंधारे खात्यापुढे आहे. मंजूर पदांच्या 20 टक्के कर्मचाऱ्यांवर आवर्तनाचे व्यवस्थापन करण्यात येत आहे. कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत पाणी वाटपासाठी भांडणारे नेते कर्मचारी संख्येवर बोलत नाही. ज्यांच्याकडून हे व्यवस्थापन करायचे आहे ते कर्मचारीच नसतील सिंचन कसे होईल याबाबत साशंकता आहे.

पाटबंधारे खात्याच्या यवत उपविभागाकडे कुंजीरवाडी ते चौफुला असे 43 किलोमीटरच्या कालव्याचे व्यवस्थापन असते. याच विभागाकडे बेबी कालवा, दहिटणे, राहु, पारगाव येथील कोल्हापूर पद्धतीचे बंधारे, खामगाव आणि माटोबा तलावाचे व्यवस्थापन यवत उपविभागाकडे असते. उपविभागात एकूण 70 ते 80 टक्के कर्मचारी कमी आहेत. यातही आजारपण, रजेमुळे कर्मचाऱयांमध्ये आणखी घट होते. दिवसभर लेखनिकाची कामे करायची आणि रात्री कालव्याचे व्यवस्थापन पहायचे अशी कामे करावी लागत आहेत.

अकुशल कर्मचा-यांकडून हे काम करून घ्यावे लागत आहे. चुका झाल्यातर कर्मचारी सरळ सांगतात हे काम आमचे नाही. त्यामुळे कर्मचा-यांना जास्त बोलता येत नाही. अशी अवस्था अधिका-यांची झाली आहे. सिंचन व्यवस्थित झाले नाही तर कर्मचा-यांना शेतक-यांच्या रोषाला सामोरे जावे लागणार आहे. 

कर्मचारी अत्यल्प असल्याने अनधिकृतपणे पाणी घेणे, जास्तीचे पाणी घेणे, सायफन, अनधिकृत कृषीपंप, दोन वेळा सिंचन करणे आदी प्रकार शेतक-यांकडून होत आहेत. अशा परिस्थितीत सिंचन व्यवस्थापन कसे करायचे असा मोठा प्रश्न सिंचन अधिका-यांपुढे आहे. यातील कनिष्ठ कर्मचा-यांची गेल्या अनेक वर्षांत भरती झाली नाही.

अनेक जण निवृत्त झाले आहेत. शेतक-यांकडून कर्मचा-यांना मारहाणीच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. त्यामुळे कालव्यावर गस्तीसाठी एकटे जाण्यास कर्मचारी घाबरत आहेत. ऐन दिवाळीत आवर्तन आल्याने अडचणीत आणखी भर पडणार आहे.

याबाबत कार्यकारी अभियंता पांडुरंग शेलार म्हणाले, टंचाईच्या काळात खऱ्या लाभधारकाला पाणी देण्याचे मोठे आव्हान आहे. कमी कर्मचारी संख्येत हे काम होत आहे. शेतक-यांनी सहकार्य केले तर सर्वांना समन्यायी पाणी वाटप होईल. पाटबंधारे विभागाच्या सर्वच उपविभागात अशी परिस्थिती आहे.   
 
शाखा कार्यालये पाच
अधिकारी 3 

कालवा निरीक्षक पदे 32
कामावर 5

मोजणीदार पदे 16
कामावर 2

चौकीदार - 0 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com