लॉकडाऊनमुळे कोरोनाचा उद्रेक 3 महिने पुढे ढकलला; तज्ज्ञ समितीचा दावा

सकाळ न्यूज नेटवर्क
Sunday, 10 January 2021

जानेवारीमध्ये देशात आणि मार्चमध्ये राज्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला. त्यानंतर रुग्णांची संख्या वेगाने वाढू लागली.

पुणे- "लॉकडाउन केले नसते, तर देशात जी अवस्था सप्टेंबरमध्ये झाली, ती जूनमध्येच झाली असती. लॉकडाउन केल्याने हा उद्रेक आपल्याला तीन महिने पुढे ढकलता आला,'' असे हैदराबादमधील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजीमधील (आयआयटी) प्रा. एम. विद्यासागर यांनी "सकाळ'शी बोलताना सांगितले.

जानेवारीमध्ये देशात आणि मार्चमध्ये राज्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला. त्यानंतर रुग्णांची संख्या वेगाने वाढू लागली. कोरोनाचा उद्रेक रोखण्यासाठी 24 मार्चपासून लॉकडाउन सुरू झाले. त्यामुळे संपूर्ण देश जागच्या जागी थांबला. अर्थचक्राची चाके जाम झाली. मात्र, संसर्ग नियंत्रणाच्या दृष्टीने लॉकडाउन नेमके कसे उपयुक्त ठरले, याच्या अभ्यासासाठी केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागातर्फे प्रा. एम. विद्यासागर यांच्या अध्यक्षतेखाली तज्ज्ञ समिती नियुक्त केली होती. त्या पार्श्‍वभूमीवर प्रा. विद्यासागर बोलत होते.

पाकिस्तानातील 'बत्ती गुल'मागे भारताचा हात; पाक मंत्र्याचा हास्यास्पद...

ते म्हणाले, ""लॉकडाउनचा कोरोना प्रतिबंधाच्या दृष्टिकोनातून नेमका कोणता परिणाम झाला, याचे मूल्यमापन समितीने केले. लॉकडाउन केले नसते तर कोरोनाबाधीतांची सर्वाधिक संख्या मे महिन्याच्या शेवटी किंवा जूनच्या सुरवातीला आपल्या देशात नोंदली गेली असती. इतक्‍या झपाट्याने कोरोनाचा संसर्ग देशभरात पसरला असता. जूनच्या दरम्यानच देशाने कोरोनाबाधीतांच्या संख्येने एक कोटीचा आकडा ओलांडला असता. पण, देशात तीन लॉकडाउन केल्याने कोरोनाच्या संसर्गाचा वेग नियंत्रित करता आला. त्यामुळे जूनमध्ये होणारा कोरोनाचा उचांक सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात यश मिळाले.''

लॉकडाउन केले नसते तर देशात जूनमध्येच एक कोटी 40 लाखांपर्यंत रुग्णसंख्या पोचली असती, ती दहा लाखांपर्यंत मर्यादित ठेवता आली. त्यामुळे लॉकडाउन करण्याचा उद्देश पूर्ण झाला, असेही त्यांनी स्पष्ट केले.

समितीतील तज्ज्ञ

कानपूर "आयआयटी'चे मनिंद्र अग्रवाल, एकात्मिक संरक्षण विभागाच्या उपप्रमुख (वैद्यकीय) लेफ्टनंट जनरल माधुरी कानिटकर, बंगळूर येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सच्या (आयआयएस) प्रा. बिमल बागची, कोलकता येथील इंडियन स्टॅटीस्टिकल इन्स्टिट्यूटच्या (आयएसआय) प्रा. अरूप बोसे, शंकर के. पाल आणि वेल्लोर येथील ख्रिश्‍चन मेडिकल कॉलेजचे प्रा. गंगदीप कांग यांचा या तज्ज्ञ समितीत समावेश होता.

"दोघींनाही मी आवडतो, मलाही त्या आवडतात"; पठ्ठ्याने एकाच मांडवात...

लॉकडाउन केला नसता तर...

1) रूग्णसंख्येचा उच्चांक लाखांऐवजी कोटीमध्ये गेला असता.
2) जूनमध्येच कोरोनाबाधीतांचा उच्चांक होऊन एक कोटी 40 लाखांपर्यंत संख्या पोचली असती.
3) जूनमध्येच सक्रिय रूग्णसंख्या 50 लाखांच्या दरम्यान असती.
4) मृत्यूदर मोठ्या प्रमाणावर वाढला असता.
ृ5) मृत्यूची संख्या आतापेक्षा 10 लाखाने वाढलेली असती.

देशात कोरोनाचा सर्वाधिक उद्रेक सप्टेंबरमध्ये होता. त्यानंतर रुग्णांची संख्या कमी होत गेली. फेब्रुवारीपर्यंत आणखी रुग्णसंख्या कमी होईल. मार्चपर्यंत जनजीवन सुरळीत होण्याची शक्‍यता आहे, असं केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या तज्ज्ञ समितीचे अध्यक्ष  प्रा. एम. विद्यासागर म्हणाले आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: due to lockdown corona virus severe situation extended said pm vidyasagar