बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे मांजरी रस्त्यावर तासनतास वाहतूक कोंडी

कृष्णकांत कोबल
बुधवार, 25 जुलै 2018

मांजरी - व्यवसायिकांचे अतिक्रमण, दोन्हीही बाजूने थेट रस्त्यातच ऊभी असलेली वाहने, खड्ड्यांमुळे संपूर्ण रस्त्याची झालेली चाळण, त्यातच पावसामुळे आलेला निसरडेपण तसेच सुरू असलेले रूंदीकरण व काँक्रीटीकरण यामुळे महादेवनगर परिसरात दररोज सकाळी व सायंकाळच्या सुमारास तासनतास वाहतूक कोंडी होऊ लागली आहे. त्यामुळे येथून प्रवास करणाऱ्या नागरिकांना सध्या मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

या परिसरात गेल्या काही वर्षांत वेगाने नागरीकरण वाढत आहे. त्या तुलनेत वाहनांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मात्र, वाहतूक व्यवस्था त्याप्रमाणात राबविली गेली नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाला रस्त्यावरील अतिक्रमणांवर नियंत्रण ठेवता आले नाही. 

सध्या या रस्त्याचे रूंदीकरण व काँक्रीटीकरणाचे काम सुरू आहे. मात्र, पर्यायी रस्त्यांची चांगली सुविधा नसल्याने याच मुख्य रस्त्यावर वाहतुकीचा भार येत आहे. सायंकाळनंतर चायनीज व इतर अन्नपदार्थांच्या गाड्या रस्त्यावर येत असतात. विविध दुकानांसमोर छोटी मोठी वाहने ऊभी केली जातात. याशिवाय अवजड वाहनेही रस्ता व्यापून टाकत आहेत. त्यातच रस्त्याचीही मोठ्याप्रमाणात दुरवस्था झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाला वारंवार तक्रार करूनही त्यांच्याकडून गांभिर्याने घेतले जात नाही. पर्यायी वाहतुकीसाठी दिलेल्या रस्त्यांची अवस्थाही दयनीय आहे. त्यामुळे दिवसेंदिवस येथील वाहतकीचा प्रश्न जटील होत आहे.

अण्णासाहेब मगर महाविद्यालयाजवळ चिखल व पाणी साचून राहत आहे. त्यातच येथे दोन्हीही बाजूला खासगी बस, टँकर व इतर हलकी वाहने ऊभी केली जातात. त्यामुळे रस्ता अरुंद होऊन मुख्य रस्ता व महाविद्यालयामागून होणाऱ्या वाहतुकीची दररोजच कोंडी होत आहे.

"सार्वजनिक बांधकाम विभागाने रूंदीकरणाचे काम होईपर्यंत सध्याच्या रस्त्याची वेळोवेळी देखभाल केली पाहिजे. पर्यायी रस्ते वाहतुकीयोग्य केले पाहिजेत. तसेच गर्दीच्या वेळी याठिकाणी वाहतूक पोलीसाची नियुक्ती आवश्यक आहे. याबाबत तातडीने कार्यवाही न झाल्यास महिला आंदोलन करतील.'
मंदाकिनी नलावडे, अध्यक्षा, हवेली तालुका महिला काँग्रेस

Web Title: Due to the negligence of the construction department, traffic jam on manjari road