पंतप्रधानांच्या पुणे दौर्‍यामुळे शवविच्छेदनास सहा तास उशीर

संदीप घिसे 
मंगळवार, 18 डिसेंबर 2018

पिंपरी (पुणे) : मेट्रोच्या भूमिपूजनासाठी मंगळवारी (१८) पंतप्रधान बालेवाडी येथे येणार आहेत. त्यांच्या बंदोबस्ताची रंगीत तालीम रविवारी (ता.१६) पोलिसांकडून घेण्यात आली. यामुळे वायसीएम रुग्णालयातील चौकीत एकही पोलिस कर्मचारी उपस्थित नव्हता. यामुळे तब्बल सहा तास शवविच्छेदन खोळंबून राहिले.

पिंपरी (पुणे) : मेट्रोच्या भूमिपूजनासाठी  मंगळवारी (१८) पंतप्रधान बालेवाडी येथे येणार आहेत. त्यांच्या बंदोबस्ताची रंगीत तालीम रविवारी (ता.१६) पोलिसांकडून घेण्यात आली. यामुळे वायसीएम रुग्णालयातील चौकीत एकही पोलिस कर्मचारी उपस्थित नव्हता. यामुळे तब्बल सहा तास शवविच्छेदन खोळंबून राहिले.

कासारवाडी येथील रहिवासी असलेले बी. चौधरी (वय ४७) यांना उपचाराकरता गुजरातमध्ये नेण्यात आले. उपचारादरम्यान शनिवारी त्यांचा मृत्यू झाला. यामुळे अंत्यविधीसाठी त्यांचे पार्थिव कासारवाडी येथे रविवारी पहाटे आणण्यात आले. 

शवविच्छेदन करण्यासाठी त्यांचे पार्थिव वायसीएम रुग्णालयात रविवारी सकाळी सात वाजता आणण्यात आले. मात्र मृतदेहाचा पंचनामा करण्यासाठी वायसीएम पोलिस चौकीत एकही कर्मचारी उपस्थित नसल्याने नातेवाईक हतबल झाले. जवळपास साडेचार तास कोणताही पोलिस कर्मचारी वायसीएम चौकीत उपस्थित नसल्याने प्रतिष्ठित नागरिकांच्या मदतीने नातेवाईकांनी पोलिसांशी संपर्क साधला. मात्र पंतप्रधानांच्या बंदोबस्ताच्या रंगीत तालीमीमुळे कोणीच कर्मचारी नसल्याचे कारण पोलिसांनी सांगितले. यामुळे नातेवाईकांनी सहाय्यक पोलीस आयुक्त सतीश पाटील यांच्याशी संपर्क साधला असता साडेबारा वाजताच्या सुमारास त्यांनी पोलिस कर्मचाऱ्याला पाठवत असल्याचे सांगितले. त्यानंतर एक वाजताच्या सुमारास पोलीस कर्मचारी वायसीएममध्ये आले. शवविच्छेदन झाल्यानंतर दुपारी अडीच वाजताच्या सुमाराला चौधरी यांचे पार्थिव नातेवाईकांकडे सुपूर्द करण्यात आले.

याबाबत बोलताना सहाय्यक आयुक्त सतीश पाटील म्हणाले, "वायसीएम रुग्णालयात नेहमी दोन पोलीस कर्मचारी असतात. पंतप्रधानांच्या बंदोबस्ताची रंगीत तालीम असल्याने त्यापैकी एक कर्मचारी काढून घेण्यात आला होता. वायसीएम रुग्णालयात कर्तव्यावर असलेल्या पोलिस कर्मचाऱ्याला इतर काम आल्याने त्याने त्या कामाकडे धाव घेतली. संबंधित नातेवाईकांची तक्रार आल्यानंतर त्वरित पोलीस देऊन कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली."

Web Title: Due to Prime Minister's visit to Pune, the postmortem is about six hours late