हिंजवडी जलमय; ‘आयटीयन’ अडकले

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 सप्टेंबर 2019

पुणे - मुसळधार पावसामुळे आयटी पार्कचा मुख्य रस्ता जलमय होऊन हजारो आयटीयन्स  वाहतूक कोंडीत अडकून पडले. भूमकर चौक, तसेच मुंबई- बंगळुरू महामार्गालगतच्या सेवा रस्त्यावर तीन फूट पाणी असल्याने कोंडीत भरच पडली. राज्यातील सर्वांत मोठ्या आयटी पार्कच्या समस्या सोडविण्यात प्रशासन अपयशी ठरल्याबाबत ‘आयटीयन्स’ने संताप व्यक्त केला.

मंगळवारी सायंकाळी अचानक जोरदार पाऊस सुरू झाल्याने रस्त्यावर पाणी साचले आणि त्यात आयटीमधील कंपन्या सुटल्या, त्यामुळे वाहतूक कोंडी झाली. याच दरम्यान दोन किरकोळ अपघाताच्या घटनांमुळे कोंडीत अधिकची भर पडली. परिणामी हिंजवडी पोलिसांना मध्यरात्रीपर्यंत कोंडी फोडण्याचे काम करावे लागले. वाहतूक कोंडीच्या चक्रात अडकून पडलेल्या ‘आयटीयन्स’नी व्हॉट्‌सॲप ग्रुप, फेसबुक, ट्‌विटरसारख्या सोशल मीडियाचा आधार घेत प्रशासनाविरोधात तीव्र भावना व्यक्त केल्या. पर्यायी रस्त्यांची कामे पूर्ण नसल्याने आयटी उद्यानात ये-जा करण्यासाठी चांदे-नांदे मार्गाशिवाय दुसरा मार्ग नाही, त्यामुळे भूमकरवस्ती व भुजबळवस्ती याच रस्त्याचा वापर करावा लागतो. महामार्ग ओलांडताना भूमकर चौक व भुजबळ चौकात दोन ठिकाणी असलेले भुयारी मार्ग पाण्याखाली गेले होते, त्यामुळे हिंजवडीच्या वाहतूक कोंडीने रूद्ररूप धारण केले. 

रस्त्यावर चर खोदून पाण्याला वाट
भूजबळवस्ती चौकात बुधवारी वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या. भूमकर चौक व सेवा रस्त्यांवर जेसीबीने चर खोदून पाण्याला वाट काढून दिल्याने पाणी कमी झाल्याचे हिंजवडीच्या वाहतूक शाखेचे निरीक्षक सुनील दहिफळे यांनी सांगितले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Due to rains flood the main road in the IT Park