डॉ. कोटणीस लेख

डॉ. कोटणीस लेख
Published on: 

लोगो : जयंती विशेष
नाव : प्रा. डॉ. मनीषा झोंबाडे

सोलापूरचा सुपुत्र, चीनचा देवदूत!
युद्धभूमीवर मानवसेवेचा वसा; डॉ. द्वारकानाथ कोटणीस यांची प्रेरणादायी शौर्यगाथा

------------------------------------
१० ऑक्टोबर १९१० रोजी सोलापुरात जन्मलेले डॉ. द्वारकानाथ शांताराम कोटणीस यांनी आपल्या सेवाभावी वृत्तीने चीनच्या इतिहासात अढळ स्थान मिळवले. भारतातील अनेकांना त्यांचे कार्य माहीत नसले, तरी चीनमध्ये त्यांचे स्मरण आजही आदराने केले जाते.
------------------------------------
सोलापुरातून चीनच्या रणभूमीवर
सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या द्वारकानाथ यांनी मुंबईतील सेठ जी. एस. मेडिकल कॉलेजमधून वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले. परदेशात जाऊन पैसे कमावण्याऐवजी त्यांनी रुग्णसेवेचा मार्ग निवडला. १९३७ मध्ये जपानने चीनवर आक्रमण केले. हजारो सैनिक जखमी झाले होते. डॉक्टर, औषधे आणि वैद्यकीय सुविधांचा अभाव होता. चीनच्या मदतीच्या आवाहनानंतर काँग्रेसचे तत्कालीन अध्यक्ष सुभाषचंद्र बोस यांनी ३० जून १९३८ रोजी भारतीयांना मदतीचे आवाहन केले. पाच डॉक्टरांच्या पथकात डॉ. कोटणीस सहभागी झाले. आई-वडिलांचा निरोप घेऊन चीनला निघताना ‘लवकरच परत येईन,’ असे त्यांनी आईला सांगितले. मात्र, हा निरोप अखेरचा ठरला.

बॅटरीच्या उजेडात रुग्णसेवा
चीनमध्ये वैद्यकीय सुविधांची दयनीय अवस्था होती. मातीच्या झोपड्यांमध्ये उपचार सुरू होते. वीज आणि औषधांचा अभाव असतानाही डॉ. कोटणीस यांनी बॅटरीच्या आणि मेणबत्तीच्या उजेडात शस्त्रक्रिया केल्या. युद्धात जखमी झालेल्या सैनिकांवर उपचार करताना त्यांनी सलग ७२ तास काम केल्याचे सांगितले जाते. त्यांच्या सेवेमुळे चिनी सैनिक त्यांना ‘के दा फू’ अर्थात ‘मोठे डॉक्टर’ म्हणू लागले. याच काळात त्यांची ओळख चिनी परिचारिका गुओ छिंगलान यांच्याशी झाली. दोघांनी विवाह केला. मुलाचे नाव ‘यिनहुआ’ ठेवले. या नावातून भारत-चीन मैत्रीचा संदेश व्यक्त होत होता.

वयाच्या ३२ व्या वर्षी निधन
सततचे काम, अपुरी झोप आणि प्रतिकूल परिस्थितीमुळे त्यांची प्रकृती खालावली. अखेर ९ डिसेंबर १९४२ रोजी वयाच्या अवघ्या ३२ व्या वर्षी चीनमध्ये त्यांचे निधन झाले. त्यांच्या मृत्यूने चीनमध्ये शोककळा पसरली. त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. डॉ. कोटणीस यांच्या कार्याच्या स्मरणार्थ चीनमध्ये स्मारक आणि संग्रहालय उभारण्यात आले. भारताने त्यांच्या सन्मानार्थ टपाल तिकीट जारी केले. प्रसिद्ध दिग्दर्शक व्ही. शांताराम यांनी ‘डॉ. कोटणीस की अमर कहानी’ या चित्रपटातून त्यांची जीवनगाथा पडद्यावर आणली. भारत-चीन संबंधांत आज तणाव असला, तरी डॉ. कोटणीस यांचे जीवन मानवतेला सीमा नसल्याची जाणीव करून देते. सोलापूरच्या या सुपुत्राची सेवा आणि त्याग नव्या पिढीपर्यंत पोचवणे, हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com