अमेरिकेतील मराठी तरुणांनी जागवला 'पावनखिंडीचा रणसंग्राम'!

सकाळ वृत्तसेवा
Friday, 7 August 2020

प्रत्यक्षात एकमेकांपासून हजारो मैल दूर असूनही सगळे एकाचवेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार करत होते. तंत्रज्ञानाने जग किती जवळ आणले आहे, याचे हे एक उत्तम उदाहरण आहे.

पुणे : जगभरात कोरोनाच्या संकटाचे सावट असताना, इंटरनेट, इ-व्यासपीठाचा खुबीने वापर करत अमेरिकेतील तरुणांनी जगभरातील निवडक मराठी मंडळांना एकत्र आणून अनोखा कार्यक्रम संयोजित केला.

मराठी माणसे जगभरात दूरपर्यंत पसरली आहेत, पण छत्रपती शिवाजी महाराज या एका धाग्याने सर्व एकत्र येतात हा अनुभव लक्षात घेऊन आणि आपला प्रेरणादायी इतिहास परदेशात वाढणाऱ्या पुढच्या पिढीपर्यंत पोहोचावा, या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित केला, अशी माहिती पीटर्सबर्ग येथील राहुल देशमुख यांनी व्यक्त केली.

विद्यार्थ्यांनो, पाॅलिटेक्निक अॅडमिशनच्या तारखा झाल्या जाहीर; वाचा सविस्तर​

शिवजयंती उत्सवाचे प्रणेते लोकमान्य टिळक यांच्या १०० व्या पुण्यतिथीनिमित्त अमेरिका, इंग्लड, युरोप, कॅनडा, सिंगापूर, मलेशिया, जपान आणि भारत असे जगभर विखुरलेले, पण महाराष्ट्राशी असलेले ऋणानुबंध अभिमानाने जपणारे २४ देशातील ५००० पेक्षा जास्त शिवभक्त २ ऑगस्ट रोजी इतिहास प्रेमी मंडळाचे अध्यक्ष मोहन शेटे यांचे 'पावनखिंडीचा रणसंग्राम!' हे इ-व्याख्यान ऐकायला एकत्र आले होते. वेगवेगळ्या प्रांतातल्या मराठी लोकांसाठी असणारे हे व्याख्यान एकाचवेळी प्रक्षेपित झाले. प्रत्यक्षात एकमेकांपासून हजारो मैल दूर असूनही सगळे एकाचवेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार करत होते. तंत्रज्ञानाने जग किती जवळ आणले आहे, याचे हे एक उत्तम उदाहरण आहे.

कोरोनावरील एक लाखाच्या औषधाविषयी अमोल कोल्हे म्हणतात...​

पीटर्सबर्गचे (अमेरिका) येथील राहुल देशमुख आणि सावली एंटरटेनमेंटचे प्रमोद पाटील यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम झाला. त्याला खालील मंडळांनी आणि मंडळ प्रतिनिधींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. 

टेनेसी मराठी मंडळ - अमेरिका (पूनम शिरवळकर, मिलिंद बोरकर), शार्लट मराठी मंडळ - अमेरिका (राहुल गरड, महेश भोर आणि संदीप पवार), ब्लूमिंग्टन मराठी मंडळ - अमेरिका (गौरी करंदीकर), नॉर्थ इस्ट ओहायो मराठी मंडळ - अमेरिका (शेखर गणोरे), नॉर्थ वेस्ट मराठी असोसिएशन - इंग्लंड (पराग पंडित आणि योगिता पाटील-सेन), कॅलगरी मराठी असोसिएशन - कॅनडा (आनंद ठकार), पीटर्सबर्ग सिनेरसिक, मराठी एंटरटेनमेंट न्यू जर्सी. 

शार्लेट, अमेरिका मंडळाचे महेश भोर यांनी कार्यक्रमाची तांत्रिक बाजू समर्थपणे सांभाळली. त्यांना सावली एंटरटेनमेंटचे (वॉशिंग्टन) धीरज बोरुडे, देविदास म्हस्की, ज्ञानेश शिंदे आणि जयश्री रोडे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. व्याख्यान पुढील लिंकवर पाहता येईल - https://youtu.be/6eGpvPy-D0w

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: e-lecture on Pavankhindicha Ransangram was organized by Marathi youths in America