"ई सर्च'ने होतेय मालकीची पडताळणी 

computer
computer

पुणे - जमीन, सदनिका अथवा दुकाने आदींचे जुने दस्तऐवज शोधण्यासाठी नोंदणी व मुद्रांक विभागाने सुरू केलेल्या "ई सर्च' या संगणक प्रणालीला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. मागील सात वर्षांत सुमारे 35 कोटी नागरिकांनी ई सर्च प्रणालीला भेट दिली आहे. दररोज सरासरी 20 ते 25 हजार नागरिक या प्रणालीला भेट देत असून, मालकी हक्काची पडताळणी करत आहेत. 

नोंदणी व मुद्रांक विभागाच्या दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये दस्त नोंदणी झाल्यानंतर लगेच ते ई सर्च प्रणालीमध्ये अपलोड केले जात आहे. रियल टाईमध्ये (तातडीने) ई सर्च वर दस्तऐवज उपलब्ध होत असल्याने नागरिकांना संबंधित मालमत्तेचा मालक कोण आहे, त्या मालमत्तेचा व्यवहार कधी झाला, याची माहिती तत्काळ घरबसल्या मिळत आहे. यामुळे जमीन, सदनिका यांच्या खरेदी-विक्रीच्या गैरप्रकाराला आळा बसण्यास मदत झाली आहे. देशात पहिल्यांदाच रियल टाइममध्ये दस्तऐवज ऑनलाइन उपलब्ध करण्याचा मान महाराष्ट्राला मिळाला आहे. 

नोंदणी व मुद्रांक विभाग नागरिकांना अधिकाधिक सुविधा ऑनलाइन पद्धतीने देण्याचा निर्णय घेतला आहे. याचाच एक भाग म्हणून खरेदी-विक्री व्यवहाराचे जुने दस्त ऑनलाइन पाहण्याची सुविधा www.igr.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. याच्याच पुढच्या टप्प्यात नोंदणी झालेले दस्त लगेचच ई सर्चमध्ये पाहण्यासाठी उपलब्ध करून दिले जात आहेत. 

एकाच जागेची किंवा सदनिकांची विक्री अनेकांना विकण्याचे प्रकार यापूर्वी उघडकीस आले आहेत. यामध्ये खरेदीदाराची आर्थिक फसवणूक होते. तसेच एक सदनिका अनेक बॅंकेत गहाण ठेवून त्याआधारे कर्ज घेतल्याचे प्रकारही घडतात. दुय्यम निबंधक कार्यालयात, नोंदणी झालेले दस्त लगेच ई सर्च मार्फत मिळत असल्याने मालमत्तेचा खरा मालक कोण, खरेदी - विक्री व्यवहार कधी झाला, याची माहिती नागरिकांना मिळत आहे. ई सर्चवर जमिनीचा सर्व्हे नंबर अथवा गट नंबरनुसार त्याचबरोबर प्रॉपर्टी कार्डच्या नंबरनुसारही मालमत्तेची माहिती मिळत आहे. 

2002 पासूनचे रेकॉर्ड उपलब्ध 
"ई सर्च'मध्ये 2002 ते आजपर्यंतचे दस्त उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या सुविधेमुळे नागरिकांना घरबसल्या दस्त पाहता येतात. या सुविधेचा वापर करून शोधलेल्या दस्ताची अथवा दस्तांच्या सूचीची (इंडेक्‍स) प्रत डाऊनलोडही करता येते. त्यामुळे ई सर्च प्रणालीला भेट देणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. 

ई सर्च ही सुविधा नागरिकांना फायदेशीर ठरत आहे. संबंधित मिळकतीच्या मालकी हक्काचा पूर्व इतिहास नागरिकांना या प्रणालीमध्ये उपलब्ध होत आहे. जमीन, सदनिका आदी मालमत्तेची खरेदी - विक्री करण्यापूर्वी नागरिकांनी ई सर्च प्रणालीचा वापर करून मालकी हक्काची पडताळणी करावी. 
अनिल कवडे (नोंदणी महानिरीक्षक) 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com